पुन्हा आयसिस

0
174

आयसिसचा सर्वोच्च नेता मानला जाणारा अबु बकर अल बगदादी तब्बल पाच वर्षांनंतर एका प्रचारकी व्हिडिओत नुकताच प्रकटला आहे. जो बगदादी हवाई हल्ल्यांत मारला गेल्याचे अमेरिका आजवर सांगत होती तो दावा खोटा असल्याचे यातून दिसते आहे. इराक आणि सीरियामधून आयसिसचा पूर्ण खात्मा केल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसिसच्या ताब्यातील बागुझ शहराचा पाडाव झाल्यानंतर गेल्या फेब्रुवारीत केली होती, परंतु एकीकडे श्रीलंकेत झालेला भीषण दहशतवादी हल्ला आणि दुसरीकडे अल बगदादीचे ठणठणीत स्थितीतील पुनरागमन या दोन्ही गोष्टी जगासाठी भयसूचक आहेत असेच म्हणावे लागेल. अल बगदादी जर हवाई हल्ल्यांत मारला गेला होता, वा हल्ल्यांत जखमी झाला होता, तर तो अशा ठणठणीत स्थितीत प्रकटला कसा? तो आहे कुठे? जारी झालेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या मागे पांढरी शुभ्र भिंत आणि खाली सपाट गालिचा दिसतो आहे. म्हणजे तो लादेन अबोटाबादेत मुक्कामाला जाण्यापूर्वी राहायचा तसा कुठल्या गुहेत वगैरे दडलेला नाही. इराक किंवा सीरियामधील एखाद्या गावी तो असावा असा कयास आता व्यक्त होतो आहे. अमेरिकेने ज्याच्याविषयी माहिती देणार्‍यास पंचवीस दशलक्ष डॉलरचे इनाम लावलेले आहे, असा अल बगदादी सुखाने राहतो आहे ही बाब जगाची झोप उडवणारी आहे. त्याचे जवळचे सर्व साथीदार मारले गेल्याचा दावा अमेरिकेने केला होता. त्याचा अंगरक्षक हवाई हल्ल्यात ठार झाला, त्याची पत्नी पकडली गेली वगैरे बातम्या अधूनमधून येत होत्या, परंतु बगदादीचा गेल्या पाच वर्षांत ठावठिकाणा नव्हता. मध्यंतरी त्याच्याकडून प्रसृत झालेल्या काही ऑडिओ संदेशांच्या सत्यतेविषयी शंका घेतली गेली होती, परंतु आता तर तो व्हिडिओत स्पष्ट दिसतो आहे. पाच वर्षांपूर्वी उत्तर इरामच्या मोसुलमधील अल नुरानी मशिदीतून इस्लामी खिलाफतीची घोषणा त्याने केली होती. त्यानंतर त्याचा थांगपत्ता नव्हता. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी इराक आणि सीरियामध्ये जोरदार मोहिमा उघडून, हवाई हल्ले चढवून आयसिसचा कणा मोडला. फलुजा, राक्का, मोसुल, तिक्रीट अशा एकेका शहरांना ताब्यात घेत स्वतःची खिलाफत निर्माण केलेल्या आयसिसला त्या एकेका शहरातून महत्प्रयासांती पिटाळून लावले गेले. त्यांच्या ताब्यातील शेवटचे शहर बागुझ दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या पाठबळाखालील सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) च्या कारवाईत मुक्त झाले आणि आयसिसची नावनिशाणी संपल्याचा दावा अमेरिकेने केला. परंतु सीआयएच्या नाकावर टिच्चून बगदादीचा व्हिडिओ आता प्रकटला आहे. एकीकडे आयसिसच्या ताब्यातील भूमी मुक्त करण्याची कारवाई सुरू असताना दुसरीकडे आपल्या संघटनेने आठ देशांमध्ये ९२ दहशतवादी हल्ले चढवल्याची शेखी बगदादी ह्या व्हिडिओत मिरवतो आहे. इराक आणि सीरियात आपल्या संघटनेविरुद्ध मोहीम उघडणार्‍या देशांना धडा शिकवा असे आवाहन आपल्या समर्थकांना करतो आहे. श्रीलंकेतील भीषण दहशतवादी हल्ला हे आयसिसच्या सैतानी कृत्यांचे सर्वांत ताजे उदाहरण आहे. म्हणजेच आयसिसच्या ताब्यातील प्रदेश जरी परत मिळवता आलेला असला, तरी ही विषवल्ली नष्ट करता आलेली नाही. तिची पाळेमुळे भारतासह अनेक देशांमध्ये रुजलेली आहेत आणि ती उखडून टाकली गेली नाहीत तर जगामध्ये विनाशाचे असेच काळेकुट्ट पर्व सुरू राहणार आहे. इराक आणि सीरियातून हाकलले गेले तरी अफगाणिस्तानात आयसिसने ‘विलायत’ म्हणजे आपला प्रदेश स्थापून तळ उभारलेला आहे. पाकिस्तानात आयसिस समर्थित दहशतवादी संघटना हल्ले चढवते आहे. श्रीलंकेमध्ये ताजा हल्ला तेथील स्थानिक संघटनेने चढवला. भारतामध्ये आयसिसची मॉड्यूल्स आणि स्लीपर सेल्स अधूनमधून उजेडात येत चालल्या आहेत. हे चित्र सुसंस्कृत जगाच्या दृष्टीने भयावह आहे. आयसिसचा म्होरक्या सुखाने राहतो आहे आणि आपले दहशतवादी जाळे चालवतो आहे आणि अमेरिकेसह जगातील बलाढ्य राष्ट्रांच्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ताही लागू नये हे नामुष्कीजनक आहे. बगदादीच्या पुन्हा प्रकटण्याने आता आयसिसच्या समर्थकांना नवे बळ लाभेल. आयसिसच्या नावाखाली परंतु स्वयंप्रेरणेने जगातील विविध देशांमध्ये उठाव करणार्‍या माथेफिरूंचे मनोबल वाढेल. त्यातून यापुढील काळामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाणही वाढू शकते. श्रीलंकेतील हल्ल्याच्या यशस्वीततेनंतर तर अशा प्रकारच्या हादरवून सोडणार्‍या हल्ल्यांचे कट आखण्यासाठी हे माथेफिरू उतावीळ असतील. त्यांचा बीमोड करायचा असेल तर संपूर्ण जगाला दहशतवाद – मग तो कोणत्याही रूपातील का असेना – त्याविरुद्ध उभे राहणे आवश्यक असेल. दुर्दैवाने आपल्या हितसंबंधांना बाधा पोहोचू नये यासाठी दहशतवादाची पाठराखण करण्याकडे चीन, पाकिस्तानसह अनेक देशांचा कल असल्याचे दिसते. यातून दहशतवादाविरुद्धची लढाई कमकुवत होते आणि मानवतेला धोका पोहोचतो हेही लक्षात घेतले जात नाही. त्यातूनच आयसिसचे हे विष फैलावत चालले आहे.