पुन्हा अयोध्या!

0
183

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाच्या नगरीत – अयोध्येमध्ये दीपावली मोठ्या धुमधडाक्यात यंदा साजरी केली. एक लाख ७१ हजार दिवे शरयू नदीच्या तटी प्रज्वलित केले गेले. चौदा वर्षांच्या वनवासानंतर प्रभु श्रीराम पुष्पक विमानाने अयोध्येत परतले या धारणेला दृष्यरूपात साकारण्यासाठी राम – लक्ष्मण – सीतेला हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आले. अयोध्येच्या कायापालटासाठी १३३ कोटींची भव्य दिव्य योजनाही त्यांनी जाहीर केलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत अयोध्या आंदोलनाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. रामजन्मभूमीचा विवाद न्यायालयाच्या अधीन असल्याने त्यासंदर्भात काही करता येत नसले, तरी उर्वरित अयोध्यानगरीसाठी योजना राबवून हिंदुत्वाचा नारा आपल्या पक्षाने गुंडाळून ठेवलेला नसल्याचेच जणू योगी आदित्यनाथ यांनी या उपक्रमातून सूचित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केंद्रीय राजकारणाच्या क्षितिजावर झालेला उदय ‘सुशासन’ आणि ‘विकास’ या दोन मुद्द्यांवर केंद्रित झाला असला, तरीही भाजपच्या आजवरच्या वाटचालीचा केंद्रबिंदू असलेले हिंदुत्व त्या पक्षाला झटकून टाकता येणे शक्य नाही. त्यांना ते अनेकदा अडचणीचे देखील ठरत आले आहे. त्यामुळे एकीकडे पक्षाला सर्व – स्वीकारार्हता मिळवून देण्याचा प्रयास करीत असताना दुसरीकडे कडव्या हिंदुत्ववादी मतपेढीलाही सांभाळून ठेवण्याची ही कसरत करणे भाजपाला आजवर भाग पडले आहे. योगी आदित्यनाथांच्या रूपाने हिंदुत्वाचे राजकारण पुढे रेटणारा चेहरा पक्षाला लाभला आहे. अयोध्येमध्ये पुन्हा रामनामाचे जागरण हे केवळ पर्यटनदृष्ट्या लाभ उठविण्यासाठीच केले गेले आहे असे मानता येत नाही. अयोध्येपासून आम्ही दूर गेलेलो नाही हे जनमानसावर ठसवण्यासाठीच हा सारा प्रयास केला गेलेला आहे हे उघड आहे. भारतीय समाजमानसावर अजूनही संस्कृती आणि परंपरेचा मोठा पगडा आहे. आपली सांस्कृतिक मूल्ये सहजासहजी सोडायला भारतीय जनमानस तयार नसते. याचा अचूक राजकीय लाभ उठविण्याचा प्रयास राजकीय पक्ष वेळोवेळी करीत असतात. जनतेच्या नित्य जगण्याशी संबंधित विषयांना जरा बाजूला सारण्यासाठी असे भावनिक विषय नेहमीच राजकारण्यांना उपयुक्त ठरत असतात. भावनिक मुद्दे पुढे आणले की इतर प्रखर विषयांचा क्षणिक विसर जनतेला पडतो आणि ते अशा वेळी राजकारण्यांच्या पथ्थ्यावर पडते. अयोध्येतील दीपावलीच्या या झगमगाटाखाली उत्तर प्रदेशच्या मूलभूत समस्या काही काळ का होईना डोळ्यांआड होणार आहेत. अयोध्येचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे काही गैर नाही. आजवर उत्तर प्रदेशचे पर्यटन मुख्यत्वे आग्रा आणि वाराणशीपुरते सीमित राहिले. त्यामुळे रामायणाची शतकानुशतके भारतीय समाजमनावर असलेली मोहिनी लक्षात घेऊन अयोध्येलाही भारताच्या पर्यटन नकाशावर आणण्याचे जर योगी आदित्यनाथ यांनी ठरवले असेल तर त्याला आक्षेप घेता येणार नाही. अर्थात, श्रीरामाचा दोनशे कोटींचा पुतळा उभारणे आवश्यक आहे का, हा वादाचा विषय होऊ शकतो, परंतु अयोध्येची स्वच्छता, सुविधा निर्मिती, गटारे, स्वच्छतालये, सुशोभीकरण यावर जो पैसा खर्च केला जाणार आहे, त्यातून त्या प्राचीन नगरीचा कायापालट होणार असेल तर ती चांगलीच बाब आहे. प्रश्न फक्त आहे तो या उपक्रमामागील भूमिकेचा. ‘अयोध्या हा माझ्या आस्थेचा विषय आहे. विरोधी पक्ष त्यात कसा हस्तक्षेप करू शकतो? असे योगी आदित्यनाथ म्हणाले. परंतु ही त्यांची आस्था पूर्ण करण्यासाठी जो पैसा खर्चिला जाणार आहे, तो काही त्यांच्या झोळीतून आलेला नाही. तो जनतेच्या करांमधून आलेला जनतेचा पैसा आहे. त्यामुळे वैयक्तिक आस्थेचे परिमाण येथे लागू होत नाही. सर्वसमावेशक भावनेतून जर ते ही विकासकामे करू इच्छित असतील तरच त्यांना स्वीकारार्हता प्राप्त होईल. केवळ श्रीरामाची नगरी अयोध्येचा विकास आदित्यनाथ सरकारला अपेक्षित आहे की, हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा आगामी निवडणुकींच्या केंद्रस्थानी आणण्याची ही सुरूवात आहे? धार्मिक ध्रुवीकरणाला नव्याने चालना तर यातून मिळणार नाही ना? प्रश्न इराद्यांचा आहे आणि त्याविषयी विरोधकांकडून साशंकता व्यक्त होताना दिसते आहे. आपली भावी राजकीय दिशा भाजपला अशी संदिग्ध ठेवता येणार नाही. उत्तरेत एक भूमिका आणि दक्षिणेत दुसरी भूमिका असा दुटप्पीपणाही भविष्यात अंगलट येऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकवार हिंदुत्वाच्या वाटेने जायचे आहे की, विकास आणि सुशासनाच्या? की दोहोंचा मेळ घालण्याचीच पक्षाची यापुढे भूमिका राहणार आहे? मोदींनी संकल्पिलेल्या ‘नव्या भारता’कडे पक्षाची वाटचाल कोणत्या मार्गाने होणार आहे? या प्रश्नांची उत्तरे जनता आज शोधू लागली आहे.