पुतळ्यांची तोडफोड हा सत्तेचा उन्माद…

0
148
  • शंभू भाऊ बांदेकर

भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तेथे गेली अनेक वर्षे सर्वधर्मसमभाव नांदत आला आहे व ज्या भारत देशाचे पोवाडे इतर देशातही गायले जातात, तेथे असे असहिष्णुतेचे हिंसक निंद्य प्रकार घडावेत हे मुळीच शोभादायक नाही…

गोव्यात नुकतेच डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचे प्रकरण बरेच गाजले व कालावधीत ते थंडही पडले किंवा ते थंड पाडले गेले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनातही त्याची दखल घेतली गेली नाही. हे पुतळा प्रकरण शमते न शमते, तोच वाळपई येथे शिवजयंतीच्या उत्सवादरम्यान तेथील चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचे प्रकरण घडले आणि तमाम स्थानिक शिवप्रेमी खवळून उठले. तब्बल एका वर्षानंतर हा पुतळा भल्या पहाटे गुपचूपपणे हटविण्याचे काम करून पालिकेने काय बरे मिळवले? जर पालिकेला हा पुतळा नको होता, तर सामंजस्याने हा प्रश्‍न मिटवता आला नसता का? पण लोकशाहीच्या नावाखाली राज्यकर्ते, नोकरशहा झुंडशाहीला, गुंडशाहीला जेव्हा प्रोत्साहन देतात किंवा त्यांना पाठीशी घालतात, तेव्हाच अशा गोष्टी घडतात व सहिष्णू कृतीला तडा पडतो.

नुकतीच विजयाच्या उन्मादाने त्रिपुरा राज्यात पुतळा तोडफोडीची जी अश्‍लाघ्य घटना घडली, त्यामुळे सारा देशच हादरला. वृत्तपत्रांनी ही बातमी पहिल्या पानावर छापण्यापासून लेख, अग्रलेखांद्वारे या घटनेचा निषेध केलेला आहे. आपण पराजयाचे आत्मचिंतन करतो हे ठीक, पण विजयाने अतिउत्साही बनून ज्या नको असलेल्या घटना आपल्याकडून घडतात, त्याचे आत्मचिंतन आपण करणार आहोत की नाही, हाच खरा प्रश्‍न आहे.

तसे पाहता गेली अनेक वर्षे त्रिपुरा राज्यामध्ये डाव्यांचे सरकार होते, पण गरीबी हटवू, बेरोजगारी नाहीशी करू, राज्याचा विकास घडवून आणू म्हणणार्‍या डाव्या राजवटीला ते शक्य झाले नाही. त्रिपुरातील संपूर्ण कॉंग्रेस भाजपात विलीन झाली व त्या आधारावर त्रिपुरा भाजपा सत्तेवर आला. ‘गरीबी हटविण्या’चा वायदा करून डावे नापास ठरले. आता ‘अच्छे दिन’च्या नावाखाली भाजपा काय पराक्रम करतो, ते नजीकच्या काळात कळेलच, पण पुतळा तोडफोडीमुळे मात्र सुरुवातीलाच अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे व त्यामुळे पंतप्रधानांपासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत सगळ्यांनाच विरोधाचा सामना करावा लागला आहे. याचे कारण म्हणजे त्रिपुरातील डाव्या पक्षाचे सरकार खाली खेचणार्‍या कार्यकर्त्यांच्या विजयाचा उन्माद दिसून आला तो असा ः दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनिया शहराच्या एका चौकात गेली पाच वर्षे उभा असलेला कम्युनिस्ट नेते व रशियाचे एका काळचे गाजलेले प्रभावी व्यक्तिमत्व असलेले लेनिन यांचा पुतळा जमावाने ‘भारत माता की जय’ च्या जयघोषात बुलडोझरने उद्ध्वस्त केला. त्यानंतर या फायबरग्लास पुतळ्याचा शिरच्छेद करण्यात आला. याचा परिणाम असा झाला की त्रिपुरा राज्यातील अनेक ठिकाणी हिंसक दंगली उसळल्या. अजूनही तेथील वातावरण अशांत आहे.

या घटनेचा परिणाम तात्काळ पं. बंगालमध्ये दिसून आला. कोलकता येथे डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासून वचपा काढला; तर कोइंबतूर येथे अज्ञात इसमांनी भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकून आपला राग व्यक्त केला. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तेथे गेली अनेक वर्षे सर्वधर्मसमभाव नांदत आला आहे व ज्या भारत देशाचे पोवाडे इतर देशातही गायले जातात, तेथे असे असहिष्णुतेचे हिंसक निंद्य प्रकार घडावेत हे मुळीच शोभादायक नाही. त्यातून आपल्या देशाची प्रतिमा डागाळायला वेळ लागणार नाही. एका बाजूने शेजारी देश आमची अशांतता भंग व्हावी म्हणून प्रयत्न करतात, तर दुसर्‍या बाजूने पक्षीय राजकारण गढूळ बनत आहे, ही चिंतनीय बाब म्हणावी लागेल.

एका बाजूने कम्युनिस्ट नेते लेनिन यांच्या पुतळ्याचा विद्ध्वंस होतो, तर देशात दीन-दलित, गोर-गरीब, दुबळ्या माणसांचा तारणहार मानला गेलेल्या तामीळनाडू राज्यातील ए. व्ही. रामस्वामी अर्थात पेरियार यांच्या पुतळ्याच्या नासधुशीची फेसबुक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. भाजपाने राष्ट्रीय सचिव एच्. राजा नावाच्या नावाने राजा, पण विचाराने रंक असलेल्या नेत्याने म्हटले की, लेनिनचे पुतळे पाडले, आता पाळी तामीळनाडूच्या पेरियारची आहे. लोकसभेतही याचे तीव्र पडसाद उमटले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टीकेस सामोरे जावे लागले. लेनिन विदेशी होते, पण पेरियार तर देशातील मोठे समाजबोधकार होते.

त्यांच्या बाबतीतही असे घडावे, यावरून राजकारण्यांचे ‘खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे’ अशी प्रतिक्रिया उमटली, तर त्यात काय चूक आहे असे कोण बरे म्हणेल? शेवटी याचा परिणाम असा झाला की, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना देशातील राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लेखी आदेशांद्वारे पुतळ्याची नासधूस करून सामाजिक सलोखा बिघडवू पाहणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, असे सांगावे लागले.
जो पक्ष ‘पार्टी विथ द डिफरन्स’ म्हणून ओळखला जात होता, त्याचे खरे स्वरुप उघड झाल्यामुळे त्या पक्षाच्या एकनिष्ठ व विवेकी नेत्यांनाही मान खाली घालावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे काही कार्यकर्त्यांना विजय पचवता येत नाही. विजयाचे परिणाम, घातपात, हिंसा, दंगल यांच्यावर होऊ नये, त्याची खबरदारी सगळ्याच पक्षांनी घेणे आवश्यक आहे. हा देश अभंग रहावा, येथे कायदा, सुव्यवस्थेचे राज्य नांदावे, येथे सामाजिक समता नांदावी असे वाटणार्‍या प्रत्येक नागरिकाने याची दखल घेतली पाहिजे. विजय किंवा पराजय हा कायम नसतो, कालानुरुप त्याच्यात बदल होतच असतात. अशावेळी विजयोत्सवामुळे पुतळ्याची तोडफोड हा सत्तेचा दुरुपयोग होतो, तो सत्तेचा उन्माद ठरतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.