पुतळाप्रश्‍नी खासगी ठरावाला सर्वांचा पाठिंबा मिळेल : लोबो

0
107

गोवा विधानसभा प्रकल्प परिसरात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी आपण जो खासगी ठराव आणला आहे त्याला चाळीसही आमदार पाठिंबा देतील, असा विश्‍वास असल्याचे मायकल लोबो यांनी काल अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सत्ताधारी पक्षातील सर्व आमदार व मंत्री यांनी या ठरावाला पाठिंबा द्यायला हवा, अशी आपली मागणी असल्याचे ते पुढे म्हणाले. तुमच्या पक्षाचा जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यास विरोध असताना तुम्ही त्यासाठीचा खासगी ठराव कसा काय आणू शकता असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, ठराव आणण्याचा अधिकार हा प्रत्येक आमदाराला आहे.

एखाद्या आमदाराला जर एखादा ठराव मांडायचा असेल तर त्याला कुणीही अडवू शकत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉंग्रेस पक्ष या संबंधी जो ठराव आणणार आहे त्याला तुम्ही पाठिंबा देणार आहात का, असे विचारले असता ठरावाला पाठिंबा देण्यापेक्षा त्याप्रश्‍नी सर्वांनी एकत्र येऊन प्रश्‍न धसास लावणे हे जास्त महत्त्वाचे असल्याचे लोबो म्हणाले.