पुणे-बंगळुरू लढत गोलशून्य बरोबरीत

0
141

एफसी पुणे सिटी आणि बंगळुरू एफसी यांच्यात काल बुधवारी खेळविण्यात आलेला हिरो इंडियन सुपर लीगच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्याचा सामना गोलशून्य बरोबरीत संपला. दोन्ही संघांनी जोरदार चाली रचत केलेल्या प्रयत्नांना फिनिशिंगची जोड मिळाली नाही. दुसर्‍या टप्याचा सामना रविवारी बंगळुरूमधील श्री कांतिरवा स्टेडियमवर होईल.

बंगळुरूविरुद्ध पुण्याने चेंडूवरील ताब्यात ५२-४८ असे वर्चस्व राखले होते. पहिल्या सत्रात सुनील छेत्रीने फ्री-किकवर घेतलेला जोरकस फटका पुणे सिटीचा गोलरक्षक विशाल कैथने अडविला. दुसर्‍या सत्रात पुणे सिटीचा बदली खेळाडू इसाक वनमाल्साव्मा याला नेटसमोर चेंडूवर नियंत्रण मिळविता आले नाही. दोन्ही संघांसाठी या संधी हुकणे निराशाजनक ठरले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उपस्थित ९२८४ प्रेक्षकांना मात्र चुरशीचा खेळ पाहायला मिळाला.

बंगळुरूने सुरुवात सावध केली होती. पुण्याच्या डावपेचांचा अंदाज घेण्याकडे त्यांचा कल होता. १९व्या मिनिटाला मार्सेलिनियोने सुमारे ३५ यार्डावरून फ्री-किकवर मारलेला चेंडू मार्को स्टॅन्कोविच याच्यापाशी गेला. मार्कोने मारलेल्या फटक्यात मात्र ताकद नव्हती. त्यामुळे चेंडू बाहेर गेला. ३१व्या मिनिटाला बंगळुरने पहिला भक्कम प्रयत्न केला. फ्री-किकवर छेत्रीने उजव्या पायाने अफलातून किक मारली. हा चेंडू पुणे सिटीचा गोलरक्षक विशाल कैथ याने उंच उडी घेत डाव्या हाताच्या बोटांनी नेटवरून घालविला. छेत्रीची संधी थोडक्यात हुकल्यामुळे बंगळुरूचे प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांना निराशा लपविता आली नाही. त्यानंतर बंगळुरूला कॉर्नर मिळाला होता. त्यावर टोनी डॉवलने उजवीकडून पेनल्टी क्षेत्रात फटका मारला. मिकूच्या दिशेने चेंडू गेला, त्याने हेडिंग केले, पण चेंडू नेटवरून गेला. ३८व्या मिनिटाला कुरुनियान याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली. त्याने मारलेला चेंडू मात्र क्रॉसबारवरून बाहेर गेला.

दुसर्‍या सत्रात ४८व्या मिनिटाला एमिलियानो अल्फारोने पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर डाव्या पायाने मारलेला फटका बंगळुरूच्या बचाव फळीकडून अडविला गेला. ५१व्या मिनिटाला बेंगळुरूच्या डिमास डेल्गाडोने कॉर्नरवर मारलेला चेंडू बोईथांग हाओकिपने हेडींग केला. तेव्हा छेत्री पुढे असूनही जुआनन याने मागून धावत येत प्रयत्न केला. त्यावेळी जुआनन याने कॉल देत समन्वय साधला नाही म्हणून छेत्रीने नाराजी व्यक्त केली.