पुढील सहा महिने १४४ कलम लागू करणे शहाणपणाचे ः विश्‍वजित

0
179

लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतरही राज्यात सोशल डिस्टन्सिंगचा भंग होऊ नये यासाठी पुढील सहा महिने राज्यात १४४ कलम लागू करणे हे शहाणपणाचे ठरणार असल्याचे काल आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यानी एका केबल वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स तसेच अन्य सामुहिक कार्यक्रमांवरही पुढील सहा महिने बंदी लागू करणे हे शहाणपणाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले.

गोवा सरकारने आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा एक अंकी राहिला असल्याचे राणे यानी स्पष्ट केले.

कोरोनाचा राज्यातील लोकांना सामूहिक संसर्ग होणार नाही याकडे यापुढेही लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणूनच पुढील सहा महिने काळजी घ्यावी लागेल त्यासाठी सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन न करणे, चित्रपटगृहे, मॅल्स बंद ठेवणे, सोशल डिस्टन्सिंगचे तत्व पाळणे आदी उपाय योजनांचा काटेकोरपणे अवलंब करावा लागणार असल्याचे राणे यानी नमूद केले.

आता कोरोनासाठीची चाचणी रोज २० तास चालू राहणार आहे. त्यामुळे चाचणीचा वेग वाढेल. गोमेकॉतील आणखी काही कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे, अशी माहितीही राणे यानी दिली.

 

तात्काळ चाचणीचे २ हजार किटस्

आरोग्य खात्याने आणली अत्याधुनिक चाचणी यंत्रे

कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठीच्या आपल्या क्षमतेत गोवा सरकार दिवसेंदिवस वाढ करीत असून आता आरोग्य खात्याने पाच अत्याधुनिक चाचणी यंत्रे व तात्काळ चाचणी करता येतील अशी २ हजार किट्‌स आणली असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. या नव्या सुविधांमुळे संशयित रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल एका तासाच्या आत मिळू शकणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. गोमेकॉत येत्या २४ तासात ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पाच अत्याधुनिक चाचणी यंत्रांपैकी एक गोमेकॉ, दोन फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात व अन्य दोन म्हापसा येथील आझिलो इस्पितळात बसवण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.