पुढील आठवड्यापासून राज्यातील रेल्वे स्थानकांवर कदंबची बससेवा

0
120

दंब वाहतूक महामंडळ करमळी, थिवी आणि मडगाव रेल्वे स्थानकावरून प्रवासी बससेवेची व्यवस्था पुढील आठवड्यापासून सुरू करणार आहे. दाबोळी विमानतळावरून वाहतूक करणार्‍या कदंबच्या बससेवेचा टप्पा टप्प्याने विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक नेटो यांनी काल दिली.

मडगाव, करमळी, थिवी या प्रमुख रेल्वे स्टेशनवरून कदंब बससेवा सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एक बसगाडी उपलब्ध करण्यात येईल. त्यानंतर गरजेनुसार बसगाड्यांची संख्या निश्‍चित केली जाणार आहे. टॅक्सीच्या दरापेक्षा कदंब बसचे तिकीट कमी असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे नेटो यांनी सांगितले.

कदंबच्या पुढील वर्षी
१०० नव्या बसगाड्या
कदंब महामंडळ पुढील वर्षात नवीन शंभर बसगाड्यांची खरेदी करणार आहे. यावर्षी ५५ नवीन बसगाड्या कदंब महामंडळाने खरेदी केल्या. त्यात स्लिपर कोच, लक्झरी बसगाड्यांचा समावेश आहे. नवीन ५५ बसगाड्यांमुळे टॅक्सी संपाच्या काळात प्रवासी वाहतुकीसाठी अधिक बसगाड्या उपलब्ध करणे शक्य झाले, असे नेटो यांनी सांगितले.