पी. व्ही. सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा

0
112

>> विश्‍व अजिंक्यपद स्पर्धा आजपासून

बीडब्ल्यूएफ विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या मागील काही आवृत्तीत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या पी.व्ही. सिंधूकडे जेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून पाहण्यात येत आहे. या स्पर्धेत दोनवेळा रौप्य व दोनवेळा कांस्यपदक सिंधूने पटकावले असून सुवर्णपदकाने मात्र प्रत्येकवेळा तिला हुलकावणी दिली आहे. यावेळी ही कसर भरून काढण्यासाठी तिने कंबर कसली आहे. २०१७ साली जपानच्या नोझोमी ओकुहारा हिने तिचा ११० मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत पराभव केला होता तर २०१८ साली स्पेनच्या कॅरोलिना मरिनने तिची स्वप्नवत वाटचाल अंतिम फेरीत खंडित केली होती. स्पर्धेसाठी पाचवे मानांकन लाभलेली सिंधू मागील काही काळापासून आपल्या तंदुरुस्तीवर तसेच बचावात्मक तंत्रावर अधिक मेहनत घेत असून या स्पर्धेत याची झलक दिसू शकते. सिंधूला पहिल्या फेरीतून पुढे चाल मिळाली आहे. दुसर्‍या फेरीत तिचा सामना तैवानच्या पाय यू पो किंवा बल्गेरियाच्या लिंडा झेतचिरी यांच्यापैकी एकाशी होणार आहे. हा सामना जिंकल्या तिच्यासमोर अमेरिकेच्या बेवेन झांग हिचे आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर तैवानची दिग्गज खेळाडू ताय त्झू यिंग असू शकते. सिंधूप्रमाणेच सायनालादेखील पहिल्या फेरीत ‘बाय’ मिळाली आहे. स्वित्झर्लंडच्या सबरिना जॅकेट व नेदरलँड्‌सच्या सोराया डी विश एबेरजेन यांच्यातील विजेत्या खेळाडूशी तिला दुसर्‍या फेरीत झुंजावे लागणार आहे. चांगला फॉर्म दाखवून आगेकूच केल्यास सायनाला उपांत्यपूर्व फेरीत ऑल इंग्लंड विजेत्या चेन युफेईशी दोन हात करावे लागू शकतात.

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला किदांबी श्रीकांत सध्या सातत्य मिळविण्यासाठी झुंजत आहे. स्पर्धेसाठी सातवे मानांकन लाभलेल्या श्रीकांतला मागील २२ महिन्यात एकाही बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. आयर्लंडच्या न्हात एनगुएनविरुद्ध तो आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. खांद्याच्या दुखापतीतून सावरत असलेली समीर वर्मा सिंगापूरच्या लोह कीन येव या खेळाडूविरुद्ध पहिला सामना खेळेल. सुरुवातीचे अडथळे पार केल्यास मध्य प्रदेशच्या समीरसमोर उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित चोव तिएन चेन हा तैवानचा द्वितीय मानांकित खेळाडू असू शकतो. स्वीस ओपनचा विजेता साई प्रणिथ कॅनडाच्या जेसन अँथनी हो शुई याच्याविरुद्ध तर एसएस प्रणॉय फिनलंडच्या इटू हेनो याच्याविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीथ रेड्डी, एमआर अर्जुन व रामचंद्रन श्‍लोक, अरुण जॉर्ज व सन्यम शुक्ला यांच्यावर मदार असेल. सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही आघाडीची जोडी या स्पर्धेत खेळणार नाही. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पी व सिक्की रेड्डी, मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम, पूजा दांडू व संजना संतोष तर मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी या जोड्या भारताचे प्रतिनिधित्व करतील. डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन, स्पेनची कॅरोलिना मरिन, चीनची शी युकी, कोरियाचा सोन वान हो, इंडोनेशियाचा तांतोवी अहमद हे दिग्गज या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. या सर्वांनी माघार घेतली आहे.