पीव्ही सिंधूला उपविजेतेपद

0
95

अमेरिकेच्या बेईवान झांगने पी.व्ही. सिंधूचा पराभव करत डॉ. अखिलेश दास गुप्ता इंडिया ओपन या वर्ल्ड टूर सुपर ५०० दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेचे काल जेतेपद पटकावले. तासभर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झांगने सिंधूचा २१-१८, ११-२१, २२-२० असा तीन गेममध्ये पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेचे जेतेपद सिंधूने पटकावले होते. परंतु, यावेळी तिला ते राखता आले नाही. बेईवानने पहिल्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सिंधूने या सामन्यात पहिला गेम हरल्यानंतर दुसरा गेम ११-२१ असा जिंकत झोकात पुनरागमन केले. तिसर्‍या गेममध्ये धमाकेदार कामगिरी करत सिंधू सामना आपल्या नावे करेल असे वाटत होते मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुका तिला भोवल्या. सुरुवातीला उभय खेळाडू १५-१५ असे बरोबरीत होते. यानंतर झांगने १७-१५ अशी आघाडी घेतली. सिंधूने दोन गुणांचे अंतर एका गुणापर्यंत कमी करताना १८-१९ अशी स्थिती केली. १९-१९ व २०-२० अशा स्थितीत सामना पोहोचला. मात्र बेईवानने त्यानंतर दोन गुण घेत २२-२०ने तिसरा गेम आणि सामना जिंकला. त्यामुळे सलग दुसर्‍यांदा इंडिया ओपन जेतेपदावर सिंधूला नाव कोरता आले नाही. बेईवानने याआधी फ्रेंच ओपनमध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता आणि ही तिची सर्वोत्तम कामगिरी होती.