पीडीएविरोधी आंदोलन सरकार अस्थिर करण्यासाठी

0
64

>> मंत्री विजय सरदेसाईंचा आरोप

पीडीएविरोधी आंदोलन हे सरकार अस्थिर करण्यासाठी सुरू केलेले आंदोलन आहे, असा आरोप काल नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पीडीएविरोधी आंदोलनासाठी राज्यातील चर्च संस्थेचा वापर काही जण करून घेऊ लागलेले असून गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या लोकांना पीडीएविरोधी मोर्चात (६ एप्रिल रोजीच्या) सहभागी होण्यासाठी सूचित करण्यात आल्याची माहिती आपणाला मिळाली असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. खूप अस्वस्थ करण्यासारखी ही गोष्ट असून आपण याबाबत आर्चबिशपशी बोलल्याचे सरदेसाई म्हणाले.

गुड फ्रायडेच्या घटनेनंतर आपण कोणाशीही चर्चा न करता अथवा बैठक न घेताच सर्व गावे पीडीएतून वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरी असताना ‘गोंयकार अगेन्स्ट पीडीए’ने ६ एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. हे पाहून आपणाला आश्‍चर्य वाटत आहे व त्याचबरोबर दु:खही होत असल्याचे सरदेसाई म्हणाले.

ताळगाव पीडीएतून
वगळण्याची मागणी नाही
ताळगावमधील कुणीही ताळगावला पीडीएतून वगळण्यात यावे, अशी मागणी केलेली नाही. असे असताना गोंयकार अगेन्स्ट पीडीए ताळगावलाही पीडीएतून वगळण्यात यावे ही मागणी कशी काय करतात असा सवाल त्यांनी केला. तशी मागणी ताळगाव पंचायतीकडून यायला हवी, असे सरदेसाई म्हणाले.