पीडीएतून गावे वगळण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत

0
148

>> विरोधकांचा इशारा

>> प्रादेशिक आराखडा २०२१ रद्दची मागणी

गोंयकार अगेन्स्ट पीडीएने काल ग्रेटर पीडीएविरोधात आझाद मैदानावर आयोजित जाहीर सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन करून पीडीएतून गावे वगळण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली. अन्यथा, ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे, असा इशारा गोंयकार अगेन्स्ट पीडीएचे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी सभेत बोलताना दिला.

पीडीए विरोधातील सभेला सांताक्रुझ, सांत आंद्रे या दोन मतदारसंघांतील नागरिकांबरोबर म्हापसा, कळंगुट, कांदोळी, पर्रा व इतर भागातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. गावाच्या नियोजनाचे अधिकार पंचायतीला देण्यासाठी नगरनियोजन कायद्यात आवश्यक दुरुस्ती करावी, प्रादेशिक आराखडा – २०२१ रद्द करावा, अशा मागण्या सभेत करण्यात आल्या. उत्तर गोव्यातील कांदोळी व इतर भागातील गावे पीडीएखाली आणण्यात नागरिकांनी सभेत तीव्र हरकत घेतली.

नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी टीसीपी मंडळाच्या ९ एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत सांताक्रुझ आणि सांत आंद्रे या दोन्ही मतदारसंघांतील गावे वगळण्याची घोषणा केली आहे. परंतु, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केलेल्या घोषणेवर विश्‍वास नसल्यानेच सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे निमंत्रक डिसोझा यांनी सांगितले.

ग्रेटर पणजी पीडीएची स्थापना घाईघाईत करण्यात आली. या पीडीएमध्ये गावांचा समावेश करताना नागरिकांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही. केवळ स्थानिक आमदारांनी केलेल्या मागणीनुसार गावांचा समावेश पीडीएमध्ये करण्यात आल्याचे समोर आले आहे. नगरनियोजन कायद्यात २००९ मध्ये दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, या दुरुस्तीबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही, असेही डिसोझा यांनी सांगितले.

ग्रेटर पणजी पीडीएमधून कदंब पठार भाग वगळला पाहिजे. बांधकाम व्यावसायिकांच्या सोयीसाठी कदंब पठाराचा भाग पीडीएमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका प्रजल साखरदांडे यांनी केली. गोव्यातील वाढते परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी खास दर्जाची गरज आहे, असेही साखरदांडे यांनी सांगितले.
गावातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी गावे पीडीएतून वगळण्याची गरज आहे, असे मत फादर ब्रिटो यांनी व्यक्त केले. राज्यात खनिज व्यवसायामध्ये लूट करायला मिळत नाही म्हणून आता राजकारण्यांनी गावांना पीडीए लागू करून लूट करण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका फादर ब्रिटो यांनी केली.
यावेळी माजी आमदार व्हीक्टोरिया फर्नांडिस, गोवा बचाव अभियानच्या निमंत्रक साबिना मार्टीन, रामा काणकोणकर, क्लॉर्ड आल्वारिस, रूडाल्फ फर्नांडिस, रोशन माथाईश व इतरांनी विचार मांडले.