पिसुर्लेतील विजय इंडस्ट्रीजला कारणे दाखवा नोटीस बजावणार

0
142

>> कॅटामाईन अमलीपदार्थ जप्ती प्रकरण

गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील विजय इंडस्ट्रीज या आस्थापनातून कॅटामाईन या बंदी असलेल्या अमली पदार्थ जप्त प्रकरणी संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या सूत्रांनी काल दिली. मंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो यांनी सदर आस्थापनाच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंडळाचा भूखंड बेकायदा व्यवसाय आणि बेकायदेशीरपणे भाडेपट्टीवर देण्यात आल्याने संबंधिताकडून भूखंड परत घेतला जाऊ शकतो. संबंधित आस्थापनाच्या मालकावर कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण घेतले जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. मंडळाने व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा दिली. सदर जागा दुसर्‍याला भाडेपट्टीवर दिली जाऊ शकत नाही. सदर जागेत ग्रील्स तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. संबंधित मालकाने लीज भाडेपट्टीवर देण्याबाबत मंडळाकडे कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्स माफियांबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ होते. दिल्लीतील महसूल गुप्तचर विभागाने बार्देश व सत्तरी तालुक्यांत छापे घालून आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांना ताब्यात घेतले आहेत. पिसुर्ले येथील आस्थापनामध्ये अमलीपदार्थ तयार करून पुरवठा केला जात होता. या अमलीपदार्थ प्रकरणात गुंतलेला एक विदेश नागरिक पर्रा येथे एक घर भाड्याने घेऊन राहत होता. सदर घराला टाळे ठोकण्यात आले आहेत. या प्रकरणी तीन विदेशी नागरिकांसह दहा जणांना अटक करण्यात आली आहे. प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

नि:पक्षपणे चौकशी करा : गोसुमं
राज्य सरकारने पिसुर्ले येथे कॅटामाईन अमलीपदार्थ प्रकरणी निःपक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचाचे सरचिटणीस आत्माराम गावकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने कॅटमाईन अमलीपदार्थ हस्तगत केलेले आस्थापन भाजपचे उत्तर गोव्यातील पदाधिकार्‍याच्या मालकीचे आहे. या प्रकरणी कसून चौकशी झाली पाहिजे. व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेली जागा परराज्यातील व्यक्तीला बेकायदेशीरपणे भाडेपट्टीवर देण्यात आली होती. राजकीय दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही गावकर यांनी सांगितले.