पिसुर्लेतील कॅटमाईन ड्रग्सप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे ः कॉंग्रेस

0
153

भाजपच्या पदाधिकार्‍याच्या पिसुर्लेतील फॅक्टरीतून जे कॅटामाईन ड्रग्स हस्तगत करण्यात आले होते त्यासंबंधी बाळगलेले मौन आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोडावे, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. त्याचबरोबर भाजपच्या ज्या पदाधिकार्‍याच्या फॅक्टरीतून हे ड्रग्स हस्तगत करण्यात आले होते तो पदाधिकारी अमली पदार्थ व्यवहारात नाही असे जाहीर करण्याचे आव्हानही चोडणकर यांनी पर्रीकर यांना दिले.

राज्यातील खाणींचा प्रश्‍न सोडवण्यास आपणाला रस आहे की नाही हेही पर्रीकर यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही चोडणकर यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपचे पदाधिकारी वासुदेव परब यांच्या पिसुर्ले येथील कारखान्यात १०० किलो एवढे केटामाईन ड्रग्स पकडणे ही साधी गोष्ट नसल्याचे चोडणकर म्हणाले. एवढे ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य गोव्यात कसे काय पोचले व गोवा पोलिसांना त्याचा पत्ता कसा काय लागला नाही, असा सवालही यावेळी चोडणकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री या नात्याने या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला हवे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

भाजप कार्यकर्त्यांची बैठक
विधानसभा संकुलात कशी?
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक पर्वरी येथील विधानसभा संकुलात कशी काय घेतली, असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला. याआधी भाजपाध्यक्ष अमित शहा गोव्यात आले असता दाबोळी विमानतळावर त्यांची सभा घेण्यात आली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विधानसभा संकुलात एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊ शकत नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अशी बैठक घेऊन एक वाईट पायंडा पाडलेला असून कॉंग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. हा सरकारने चालवलेला सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप पणजीकर यांनी केला.