पावसाळ्यात खाणींपासून सुरक्षेची जबाबदारी खाण लीजधारकांवर

0
152

राज्यातील खाणींच्या पावसाळ्यातील सुरक्षेची जबाबदारी लीजधारकांवर सोपविण्यात आलेली असून त्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. खाण सुरक्षा महानिरीक्षकांनी राज्यातील खाणींच्या सुरक्षेबाबत पावसाळ्यात घेण्यात आलेल्या उपाय योजनांवर समाधान व्यक्त केले आहे.

खाण सुरक्षा महानिरीक्षक कार्यालयाकडून ६ जून आणि १३ जून २०१८ अशा दोन वेळा खाण खात्याच्या अहवालाप्रमाणे संवेदनशील असलेल्या खाणींची तपासणी करून खाण सुरक्षेच्या उपाय योजनांचा आढावा घेतला आहे. या टप्प्यावर खाणींना कोणताही धोका नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. येत्या २६ ते ३० जून दरम्यान परत एकदा संवेदनशील खाण खंदकांची तपासणी करून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी दिली.

खाण सचिव दौलत हवालदार यांच्या अध्यक्षतेखाली १९ जूनला पर्वरी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत खाण खंदकांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली आहे. लीज धारकांकडून खाण खंदकांवर सुरक्षा उपाय हाती घेतले आहेत.
राज्यातील खाणींच्या सुरक्षेबाबत हयगय केली जाऊ नये तसेच स्थानिकांना त्रास होणार नाही किंवा आपत्ती ओढवणार नाही, याबाबत सतर्कता बाळगण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.

पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून देखरेख पथके तयार करण्यात आली आहेत. खाण खंदकावर देखरेख ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. संवेदनशील खाणींना खास पथकाकडून वरच्यावर भेटी देऊन सुरक्षा उपाय योजनांचा नियमित आढावा घेतला जात आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक आचार्य यांनी दिली.