पावसाळ्यातील साथीचे रोग ः डेंग्यू ताप

0
995
  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

घरात फक्त ‘ऑल-आऊट’ लावले म्हणून होत नाही. डासांचा नायनाट करण्यासाठी किरकोळ वाटल्या तरी महत्त्वाच्या बाबींवर विचार करून घरचा परिसर प्रथम स्वच्छ करावा. पाणी साठायला कुठेच वाव देऊ नये. साध्या बाहेर टाकलेल्या प्लॅस्टिक कपमध्ये जरी त्याला साचलेले पाणी सात-आठ दिवसांकरिता मिळाले तरी त्यात डासांचा जन्म होतो.

या आजारात पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे पाण्याचा काढा, फळांचा रस, दूध, सूप, मुगाचे कढण यांसारखे द्रवपदार्थ शरीरात जातील याकडे लक्ष दिले पाहिजे.

निसर्ग अगदी जर्द हिरवा शालू नेसून नटलेला आहे. दर्‍या-खोर्‍यातून नितळ पाण्याचे झरे वाहत आहेत. प्रत्येकजण या पावसाचा आस्वाद घेऊन आनंद लुटण्याच्या तयारीत आहे. सुट्टीची वाट पाहात आहे. पण तत्पूर्वी एक महत्त्वाचे- एखादी सुट्टी घरातील व घराबाहेरील स्वच्छतेसाठी काढा. कारण पाऊस जसा आनंद देतो तसा साथीच्या रोगांनाही आपल्या सोबत घेऊन येतो व हे साथीचे रोग बहुतांशी घरगुती पाणीसाठ्यात वाढणार्‍या डासांमुळेच होतात. पावसाळ्यात साठून राहिलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास होते आणि डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. जे पाणीसाठे उघडे आहेत अशा साठ्यात कुंड्या, फुलदाण्या, कारंजी, कुलरचे ट्रे, खराब टायर्स, नारळाच्या करवंट्या, आजूबाजूला पडलेले फुटके डबे, बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या अशा एक ना अनेक वस्तू आपल्या घराच्या परिसरात पडलेल्या असतात. बर्‍याच वेळा याचं गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. घरात फक्त ‘ऑल-आऊट’ लावले म्हणून होत नाही. डासांचा नायनाट करण्यासाठी किरकोळ वाटल्या तरी महत्त्वाच्या बाबींवर विचार करून घरचा परिसर प्रथम स्वच्छ करावा. पाणी साठायला कुठेच वाव देऊ नये. साध्या बाहेर टाकलेल्या प्लॅस्टिक कपमध्ये जरी त्याला साचलेले पाणी सात-आठ दिवसांकरिता मिळाले तरी त्यात डासांचा जन्म होतो. त्यात एडीस बाळाचा जन्म झाला तर मग डेंग्यूला आमंत्रण.
डेंगी हा ताप विषाणुमुळे मानवाला होणारा आजार आहे. ज्या भौगोलिक भागात एडिस एजिप्टाय आणि एडिस ऍल्बोपिक्टस या प्रकारचे डास असतात आणि डेंगी विषाणूचे एकापेक्षा जास्त प्रकार आढळतात तेथे डेंगीची लागण होते. या डासाची मागी मानवी राहण्याच्या जागांच्या ठिकाणी एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे डेंगी तापाचे विषाणू संक्रमित करण्यात मोठी भूमिका बजावते. या डासांमध्ये डेंगी विषाणूंची वाढ ८ ते १० दिवसात पूर्ण होते. विषाणुयुक्त डास त्याचा जीवनकाळ संपेपर्यंत दूषित राहून अनेक व्यक्तींमध्ये डेंगीतापाचा प्रसार करू शकतो. या डासांच्या पायावर पांढरे पट्टे असतात. म्हणून त्यांना ‘टायगर मॉस्न्युटो’ असे म्हणतात. हे डास दिवसा चावतात(डे बीटर)…
– अत्यंत वेगाने होत असलेले नियोजनशून्य शहरीकरण डेंगी वाढीचे एक प्रमुख कारण.
– पाण्याचे योग्य व्यवस्थापन नसताना शहरीकरणाची असंतुलित प्रक्रिया.
– अनियंत्रित लोकसंख्या वाढ.
– प्रचंड प्रमाणात होत असलेले स्थलांतर
– वाढते आंतरराष्ट्रीय दळणवळण
– अपुर्‍या नागरी सुविधा.
– अविघटनशील वस्तूंचा (बाटल्या, डिस्पोजेबल कप, प्लॅस्टिक वस्तू) यांचा मोठ्या प्रमाणावर वापर,
– कीटक नियंत्रण कार्यक्रमाला भेडसावणार्‍या अनेक त्रुटी.
– दुय्यम दर्जाची कीटकनाशके, अळीनाशके.
– नियोजनाचा अभाव, सर्वेक्षणातील त्रुटी.
– नागरिकांचे घोर अज्ञान. स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी. ही सर्व कारणे डेंगी डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत आहेत.
डेंगीचा विषाणू माणूस आणि डास दोघांत राहू शकतो. माणसातून डासाकडे आणि डासाकडून माणसाकडे या विषाणूच्या परिक्रमा चालू राहतात. माणसाला ताप येण्यापूर्वीच्या आदल्या दिवशी एडीस एजिप्टाय डास माणसाला चावला तर डासाच्या अंगात डेंगीचा विषाणू प्रवेश करतो. तापाच्या पाचव्या दिवसापर्यंत कधीही डास चावला तरी त्या डासाच्या शरीरात विषाणू जाऊ शकतो. डासाच्या शरिात ८ ते् १० दिवस विषाणू वाढतात. नंतर डास जिवंत असेपर्यंत केव्हाही तो डास माणसाला चावला तरी डेंगीचा आजार होऊ शकतो.
डेंगी कोणत्याही स्त्री-पुरुषाला कोणत्याही वयात होऊ शकतो. या आजाराचे तीन महत्त्वाचे प्रकार असतात. पहिल्या प्रकारात विशिष्ट तर्‍हेचा ताप येतो. दुसर्‍या प्रकारात ताप, रक्तस्राव होतो परंतु रुग्णाचा रक्तदाब कमी होत नाही आणि तिसर्‍या प्रकारात ताप, रक्तस्राव होतो आणि रक्तदाब कमी होऊ शकतो.
अनेकदा डेंग्यूचा विषाणू शरीरात जातो, परंतु रुग्णास त्रास होत नाही. कोणताही उपचार केला नाही तरी बहुतेक वेळा डेंगीचा ताप निसर्गतः उतरतो. ज्या भागात एडिस एजिप्टाय आणि एडिस ऍल्बोपिक्टस या प्रकारचे डास असतात आणि डेंग्यू विषाणूचे एकापेक्षा जास्त प्रकार आढळतात. तेथे रक्तस्राव व शॉक असणारे डेंगीचे रुग्ण आढळतात. आपल्याकडे डेंग्यूच्या विषाणूमुळे ताप येणे ही एक सर्वत्र घडणारी घटना आहे. त्या मानाने रक्तस्राव होणे ही घटना कमी प्रमाणात होताना दिसते.
डेंग्यूमध्ये होणार्‍या तापाला अस्थि-भंग-ताप म्हटले जाते. चार उपजातींपैकी कोणत्याही एका किंवा अधिक उपजातीने डेंग्यू होऊ शकतो. डेंगी तापाच्या साथी येऊ शकतात किंवा एकट्या-दुकट्या माणसालाही डेंगी होऊ शकतो. पावसाळ्यात एडीस इजिप्टाय नावाच्या डासांची वाढ खूप होते. त्यामुळे पावसाळ्यात साथी येण्याची शक्यता वाढते. थंड हवेत (वीस अंश तापमानाखाली) वातावरणात थंडी असेल तर डेंगीच्या विषाणूचा प्रसार होत नाही. त्यामुळे या दिवसात रक्तस्राव होत नाही.

* डेंगी तापाची लक्षणे….
– साधारणपणे डास चावल्यावर ५ ते ६ दिवसांनी थंडी भरून ताप येतो.
– तापाबरोबर प्रचंड प्रमाणात डोकेदुखी होते. स्नायू आणि सांधे दुखतात. या सांधेदुखीमुळे हालचाल कठीण होते.
– चोवीस तासांच्या आत डोळ्याच्या बुब्बुळांच्या मागे वेदना सुरू होतात. डोळे हलविण्याने किंवा डोळ्यांवर दाब येण्याने ही वेदना विशेष जाणवते. उजेड नकोसा वाटतो.
– प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो.
– अन्न खावेसे वाटत नाही. अन्नाला चव लागत नाही.
– मलावरोध होतो.
– पोटात कळ यावी असे दुखते आणि पोटावर दाब दिले तर दुखते. घसा दुखतो.
– ताप १०२ ते १०४ डिग्रीफॅ. असतो. त्यानंतर काही तासांपासून दोन दिवसांपर्यंत ताप आपोआप उतरतो. या ताप उतरलेल्या स्थितीत अथवा परत ताप चढताना ऐंशी टक्के रुग्णांना अंगावर पुरळ उठते. हा परत आलेला ताप एक किंवा दोन दिवस टिकतो. तापाच्या सुरुवातीला पुरळ बारीक ठिपक्यांप्रमाणे चेहरा, मान आणि छातीवर दिसतो. पुढे ३र्‍या-चौथ्या दिवशी येणार्‍या पुरळामध्ये हे ठिपके मोठे असतात. हे नंतर येणारे पुरळ छातीवर किंवा पाठ-पोट येथे प्रथम दिसते व हातापायावर पसरते. सहसा चेहर्‍यावर पुरळ उठलेले दिसत नाही. हे पुरळ दोन तासांपासून कित्येक दिवसांपर्यंत टिकते. नंतर तेथील त्वचा खपल्या अगर भुग्याच्या स्वरूपात गळून पडते.
– एकूण ताप सहसा पाच (क्वचित सात) दिवस टिकतो.

* डेंग्यू तापाचा दुसरा प्रकार – म्हणजे रक्तस्राव होणे-
लक्षणे – एनॉफिलिस एजिप्टाय प्रकारच्या डासांमार्फत या प्रकारच्या आजाराचा प्रसार होतो.
– डास चावल्यावर चार ते सहा दिवसांनी जोरात ताप येऊ लागतो.
– चेहरा लालसर दिसू लागतो.
– डोकेदुखी, अन्नद्वेष, उलट्या, पोटात दुखणे आणि पोटात वरच्या भागात उजवीकडे दाब दिल्यास दुखते.
– ताप १०३ ते १०६ अंश फॅरे. इतका वाढू शकतो.
– लहान मुलांना फिट्‌स येऊ शकतात.
– रक्तातील प्लेटलेट्‌स कमी होऊ शकतात.
– पुरळ उठलेल्या अंगावर त्वचेतून रक्त झिरपू लागते. हिरड्यातून रक्त वाहू लागते. रक्ताची उलटी होते.
– शौचाला डांबरासारखी काळीभोर होते.

* डेंगीचा तिसरा प्रकार – म्हणजे डेंगी शॉक सिंड्रोम.
यात डेंगीच्या सर्व लक्षणांच्या जोडीला नाडीची गती वाढते व रक्तस्राव कमी होतो. हा एक गंभीर आणि घातक आजार झालेला असतो. याला इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल करून प्लेटलेटच्या पेशी रक्तात भराव्या लागतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण मृत्युमुखी पडण्याचा संभव फार मोठा असतो.

* डेंग्यू होऊ नये म्हणून…..
– घरात साफसफाईवर विशेष लक्ष द्यावे.
– घरात पाणी भरून ठेवायचे असल्यास ते झाकून ठेवावे.
– गरज नसल्यास पाणी टाकून देऊन भांडी उलटी घालून ठेवावी. जेणेकरून भांड्यामध्ये डास साठणार नाहीत.
– कूलर, कुंड्या यांचा वापर करताना रोजच्या रोज पाणी बदलावे.
– रात्री झोपताना संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावे.
– लहान बालकांना मच्छरदाणीत झोपवावे.
– घराभोवती परिसर स्वच्छ ठेवावा. निरुपयोगी टायर्स, नारळाच्या करवंट्या, मोकळे फुटके डबे, बादल्या इ. वस्तूंची विल्हेवाट लावावी.
– धूर फवारणी, महापालिका/ग्रमपंचायत यांची स्वच्छता विभाग कर्मचारीमार्फत करावी.
– मोठ्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडावे.
– रात्री झोपताना डास चावू नये म्हणून क्रीम, स्प्रे, लिक्वीड लावावे.
डेंग्यूपासून बचाव कसा कराल?…

* घरात किंवा घराच्या आसपास पाणी साठू देऊ नये.
* ताप आल्यास स्वतःच औषधे न घेता वैद्याचा सल्ला घ्यावा.
काही नैसर्गिक उपाय-
* घरातल्या खिडकीत तुळशीचे रोप लावा.
* कडुनिंबाची सुकी पाने आणि कापूर यांची धुरी केल्यास घरात आलेले डास मरतात. त्याशिवाय लपलेले डासही निघून जातात.
औषधोपचार व आहारादी उपाययोजना ….
या आजाराचे निदान जेवढ्या लवकर होईल तेवढेच चांगले. व्याधीक्षमत्व कमी असलेल्या रुग्णास हा आजार लगेच जडतो. म्हणून व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी गव्हांकूराचा रस किंवा आवळ्याचा रस द्यावा. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास च्यवनप्राशाचाही उपयोग करता येतो.
– २५ ग्रॅम गुळवेल, ४-५ तुळशीची पाने तसे २-३ काळी मिरी वाटून एक लीटर पाण्यात उकळवा. दिवसभर हे पाणी थोडे थोडे प्या, हा काढा स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या विषाणूजन्य संसर्गापासून बचाव करते.
– तसेच गुडुची स्वरस किंवा गुडूची सत्त्व, तुलसी स्वरस, चिरायत्याचा काढा, पंचामृत लोह, पपईच्या पानांचा स्वरस यांचा उपयोग होतो.
– लक्षणानुरूप तापाची तीव्रता पाहून औषधांची उपाययोजना करावी. त्याचप्रमाणे ताप जास्त असल्यास संपूर्ण अंग थंड पाण्याने पुसून काढावे.
– या आजारात पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे पाण्याचा काढा, फळांचा रस, दूध, सूप, मुगाचे कढण यांसारखे द्रवपदार्थ शरीरात जातील याकडे लक्ष दिले पाहिजे.
चांगला सकस आहार, व्यायाम व योगसाधना ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. त्यामुळे वर्षभर नेहमीच चालू ठेवल्यास डेंग्यूची साथ येण्याची भीतीच उरणार नाही. डासांच्या निर्मितीलाच आळा बसेल.