पावसाळ्यातील आजारांवर मात

0
166
  • डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

वर्षा ऋतूत देहदुर्बलता व पित्ताची संचयावस्था ही शरीराची स्थिती असते. पण देहदुर्बलता जरी असली तरी अग्निमांद्य व वातप्रकोप लक्षात घेऊन बल्य औषधे न देता प्रथम पचनशक्ती वाढवून नंतरच बल्य औषधे द्यावीत. तसेच पित्ताचा संचयकाळ असल्याने पित्तकर आहार-विहार टाळावा.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे रोगजंतू झपाट्याने वाढतात व विविध रोगांची लागण व प्रसारण होत असते. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायरिया, टायफॉइड, व्हायरल फीवर, कॉलरा, पोटातील इन्फेक्शन असे विविध रोग दूषित पाणी व दूषित वातावरणामुळे उत्पन्न होतात. आयुर्वेदाप्रमाणे या व्याधींव्यतिरिक्त वर्षा ऋतूमधील अग्निमांद्य व वातप्रकोप लक्षात घेऊन अग्निमांद्यामुळे अपचन, अरुची, भूक न लागणे, मलावष्टंभसारखे व्याधीही पावसाळा घेऊन येतो. तसेच वातप्रकोपामुळे संधिवात, सिराग्रह, इ. वातव्याधींमध्ये वृद्धी होते असे सांगितले आहे.

जलदुष्टीजन्य व्याधी (वॉटर बॉर्न डिसीझेस) ः
या व्याधी पावसाळ्यात नेहमी आढळणार्‍या आहेत. या रोगांची तीव्रता इतकी असते की डायरियासारख्या रोगांची साथ पसरली तर अगदी मृत्युसुद्धा होऊ शकतो. बर्‍याचवेळा पूर आल्यास डायरिया, कॉलरा, मलेरियासारखे रोग पसरतात.
सध्या शहरात, गावात पाण्याचा मुख्य पुरवठा हा नदीद्वारे होतो. पावसाळ्यात पावसाचे पाणी वेगवेगळ्या उतारांवरून वाहत येऊन नद्यांना मिळते. यावेळी ठिकठिकाणची घाण नदीत येऊन मिसळते.
शहरातील गटारे अनेक वेळा नदीत सोडली जातात.
नदीतिरावरील खेड्यातील व शहरातील लोक नदीत जनावरे धुणे, कपडे धुणे, मलविसर्जन करणे या गोष्टींमुळे नदीचे पाणी दूषित करतात. यामुळे रोगजंतूंचा फैलाव होतो.
मृत जनावरे नदीत टाकून देणे यामुळे रोगी मृतांच्या शरीरावरील रोगजंतू नदीत मिसळतात.
विविध कारखान्यातील दूषित पाण्याचे प्रवाह नदीत सोडले जातात.
अस्वास्थ्यकर व्यवसायांची घाण नदीत टाकली जाते.
तसेच या सर्व कारणांव्यतिरिक्त पावसाचे पाणी जिथे-तिथे डबक्यात, उघड्या टाकलेल्या प्लॅस्टिकच्या भांड्यात साचले जाते व या साचलेल्या पाण्यामध्ये विविध प्रकारचे रोगजंतू निर्माण होतात. विविध प्रकारच्या माशा, डास यांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होते व टायफॉइड, मलेरिया, कॉलरा, डेंग्यूसारख्या रोगांचा फैलाव होतो.
जलदुष्टीजन्य व्याधी हे दूषित पाण्यामुळे होतात. उघड्यावरील, हातगाड्यांवरील पदार्थ खाणे, घाणेरडे हात, कपडे, जेवणाची भांडी वापरल्याने, तसेच उघड्यावर शौचास जाणे, माशा, डासांद्वारे या रोगांचा फैलाव होतो.

उपाययोजना ः
अशा प्रकारच्या रोगांपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास प्रथमतः पाणी शुद्धीकरण योग्य प्रकारे व्हायला हवे.
घरीसुद्धा पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, दात घासण्यासाठी जे पाणी वापरतो ते पाणी व्यवस्थित गाळून घेऊन उकळले पाहिजे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर पाच मिनिटे पाणी चांगले उकळले पाहिजे.
पावसाळा हाच जंतूंचा प्रजननचा काळ असल्या कारणाने रोगांचा फैलाव झपाट्याने होतो म्हणून खाण्याचे पदार्थ चांगले झाकून ठेवावेत. पाण्याचे क्लोरीनेशन करावे. हात-पाय धुणे इ. शारीरिक स्वच्छता योग्य प्रकारे करावी. लहान मुलांना विशेषतः संडासातून आल्यानंतर व्यवस्थित साबण लावून हात धुण्यास सांगावे.
पिण्यासाठी फक्त फिल्टरचे पाणी वापरावे. बाहेर गेल्यास बाटलीतील पाणी वापरावे.
रोज पाण्याची भांडी व्यवस्थित घासावी.

घरचे ताजे, गरम अन्न जेवावे.
– प्रत्येकाने आपल्या हातांची नखे वेळचेवेळी कापून स्वच्छ ठेवावीत.
मलविसर्जन करताना स्वच्छ शौचालयांचा वापर करावा.
जेवण बनवताना भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्याव्या.
उघड्यावरचे खाणे, ज्यूस, मिल्कशेकसारखे रस्त्यावरचे पिणे टाळावे.
आजारी माणसांना हॉस्पिटलमधून भेटून आल्यानंतरही हात-पाय स्वच्छ धुवावेत.
नद्या, तलाव ही जास्त प्रमाणात बॅक्टेरियांची अंडी घालण्याची जागा आहे. त्यामुळे अशा पाण्यात पोहणे टाळावे.
अशाप्रकारे विविध उपाययोजनांनी जलदुष्टीजन्य रोग आपण टाळू शकतो.
पावसाळ्यात दुसरा महत्त्वाचा बिघाड होतो तो अग्नीचा. पावसाळ्यात स्वभावतः अग्निदुष्टी होते. म्हणून भूक न लागणे, पचनक्रिया बिघडणे, कधी तार तर कधी अतिसार असे पोटाचे विविध विकार उत्पन्न होतात. या सगळ्या व्याधींचे मूळ कारण अग्निमांद्य.

अग्निमांद्य –
म्हणजे पचनशक्ती कमी होणे. पावसाळ्यात स्वभावतः पचनशक्ती कमी होते पण आहार सेवनामध्ये आपण बदल न केल्यास अतिप्रमाणात आहार घेणे, विषम आहार घेणे, जड, थंड, अतिरुक्ष, शिळे अन्न, योग्य काळी अन्न न घेणे, जेवल्यावर लगेच झोपणे अशा प्रकारचा आहार-विहार चालू ठेवल्यास आपल्या पचनशक्तीमध्ये अजूनच विकृती होते व आमोत्पत्तीतून विविध व्याधी निर्माण होतात.

अग्नीचे रक्षण करण्यासाठी आहार-विहारावर नियंत्रण हवे. आहार योग्य मात्रेत व हितकर असा असावा. मानसिक स्वास्थ्यही बिघडू न देणेही आवश्यक आहे.
लघू, अन्न पथ्यकर, विशेषतः जीर्ण शालिषष्टिक व मुद्ग यूष हे अधिक पथ्यकर.
स्निग्ध, अम्ल व लवण रसात्मक औषधी द्रव्ये वापरावीत.
लंघन करावे. लंघन हे पूर्ण्र उपाशी राहून करू नये.
औषधी कल्पांमध्ये आमपाचक वटी, अग्नितुंडी, लशुनादी वटी, भास्कर लवण चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण आदी कल्पांचा प्रामुख्याने उपयोग करावा.
औषधे व लंघन यामुळे जसाजसा अग्नी वर्धमान होत जाईल, तसतसा आहारही वाढवत जावा. आहारात तूपाचा वापर करावा. पण तूपात तळलेले पदार्थ मात्र कटाक्षाने टाळावेत.

आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वर्षा ऋतूंत अग्निमांद्याबरोबर वातप्रकोपही होत असतो. म्हणूनच अनेक प्रकारचे वातव्याधीही उत्पन्न होतात किंवा ज्यांना वातव्याधीचा त्रास आहे त्यांचे आजार बळावतात. वातप्रकोपाविषयी आपण मागील अंकात सविस्तर माहिती दिलेली आहेच.
तसेच वर्षा ऋतूत देहदुर्बलता व पित्ताची संचयावस्था ही शरीराची स्थिती असते. पण देहदुर्बलता जरी असली तरी अग्निमांद्य व वातप्रकोप लक्षात घेऊन बल्य औषधे न देता प्रथम पचनशक्ती वाढवून नंतरच बल्य औषधे द्यावीत. तसेच पित्ताचा संचयकाळ असल्याने पित्तकर आहार-विहार टाळावा.
पावसाळ्यात वातप्रकोप, अग्निमांद्य, देहदुर्बलता, पित्ताची संचयावस्था तसेच जलदुष्टीजन्य व्याधी या सर्वांचा विचार करून योग्य असा आहार-विहार घ्यावा.