पावसाळी विधानसभा अधिवेशनासाठी आतापर्यंत ४०९ तारांकीत प्रश्‍न

0
116

>> सभापती राजेश पाटणेकर यांची माहिती

गोवा विधानसभेच्या येत्या १५ जुलै २०१९ पासून सुरू होणार्‍या २० दिवसांच्या पावसाळी अधिवेशनासाठी आत्तापर्यंत ४०९ तारांकित आणि ८९३ अतारांकित प्रश्‍न आले आहेत, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

सभापती पाटणेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनातील कामकाजावर चर्चा करण्यात आली.
पावसाळी अधिवेशनात पहिले तीन दिवस राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणावर आभारदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन दिवस वर्ष २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच १५ दिवस अनुदानित पुरवणी मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सभापती पाटणेकर यांनी दिली.

या अधिवेशनासाठी काही सरकारी विधेयके सादर केली जाणार आहेत. परंतु, अजूनपर्यंत एकही सरकारी विधेयक सादर करण्यात आलेले नाही. आमदार अधिवेशनासाठी १७ जुलैपर्यंत प्रश्‍न पाठवू शकतात. तसेच खासगी ठराव २५ जुलैपर्यंत सादर केले जाऊ शकतात. या बैठकीत काही सदस्यांनी उत्तरांची लिखित प्रत देण्याची मागणी केली. विधानसभेचे कामकाज पेपरलेस असल्याने हार्ड कॉपी दिली जाऊ शकत नाही, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचे सभापती पाटणेकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

विधानसभेच्या अधिवेशनाच्या कालावधी आणखी वाढविण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. २० दिवसांचे पावसाळी अधिवेशन जास्त कालावधीचे आहे, असे सभापती पाटणेकर यांनी सांगितले.