पावसाळा आणि जिभेचे लाड

0
164
  •  गौरी भालचंद्र

बाहेर कोसळणारा पाऊस, अंगावर शहारे आणणारा हवेतला गारवा, हातातल्या कपातला वाफाळता चहा हे दृश्य जोडीला चमचमीत भजी, वडापाव किंवा तत्सम काहीतरी चटकदार खाऊ असल्याशिवाय पूर्णच होत नाही.

हातगाडीवरती ठेवलेली कणसं, छोटी शेगडी आणि त्या निखार्‍यांना फुलवत कणसं भाजून देणारा मनुष्य… पावसाळ्याच्या सुमारास दृष्टीस पडणारं हमखास दृश्य. आताशा तर साधी कणसं मिळतच नाहीत, सगळीकडे स्वीटकॉर्नच मिळतात. मग ही कणसं गॅसवर किंवा घरच्या घरी बार्बेक्यूवर भाजा, त्याला एखाद्या लिंबाच्या फोडीने तिखट-मीठ लावा आणि स्वर्गसुखाचा आनंद लुटा.. अगदीच काही चमचमीत आणि चटपटीत खायला नसलं तरी आलं किंवा गवती चहा घातलेला वाफाळता गरमागरम चहाचा कप हाती असणं यापरतं पावसाळ्यातलं सुख ते काही नाही.

मुंबई-पुण्याला वर्षभर लोक वडापाव खात असले तरी पावसाळ्यातल्या वडापावची मजा काही औरच आहे. सोबत तळलेली मिरची, वडापावाचा चुरा आणि लालभडक चटणी!! अहाहा.. पावसाळ्यात घरी किमान एकदातरी कांदाभजी होतातच होतात. पण कांदाभजी हे चांगलं पेशन्सचं काम आहे. आधी कांदा कापून ठेवा, त्यात मीठ घालून कांद्याला पाणी सुटेल याची वाट पाहा आणि मग बेसन कालवून भजी करा. खाताना मात्र हे वाट पाहणं कारणी लागल्याचं मस्त फीलिंग येतं.. सूप पिण्याची मजा काही औरच. थोडीशी काळी मिरी घातलेलं गरमागरम सूप छान घसा पण शेकतं आणि पावसाळ्यात तरतरीही देतं.
खुसखुशीत वडा आणि आलं घातलेला चहा हे पदार्थ मुंबईकरांचा पावसाळा अधिक चविष्ट करून जातात. म्हणूनच पावसाच्या सरींसोबत मुंबईतल्या विविध ठिकाणी वडापाव चाखण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी होत आहे. वडापाव म्हणजे मुंबईकरांची अस्सल चव.. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावाचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणार्‍या वडापावानं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बाहेर कोसळणारा पाऊस, अंगावर शहारे आणणारा हवेतला गारवा, हातातल्या कपातला वाफाळता चहा हे दृश्य जोडीला चमचमीत भजी, वडापाव किंवा तत्सम काहीतरी चटकदार खाऊ असल्याशिवाय पूर्णच होत नाही. पण एकीकडे चमचमीत भज्यांवर मनापासून ताव मारत असताना दुसरीकडे मात्र आपण अतिशय तेलकट पदार्थ खात असल्याची जाणीवही मनामध्ये असतेच. बाहेर मस्त पाऊस पडायला लागला की आपल्याला चमचमीत खाण्याचे वेध लागतात. पाऊस कोसळू लागला की गरमागरम कांदाभजी आणि आल्याचा वाफाळता चहा असा बेत एकदा तरी झालाच पाहिजे. चमचमीत खाण्यासाठी मन आतूर झालेले असते.