पावसामुळे पुढील ४ महिने खाण उद्योग बंद

0
133

राज्यात पाऊस सुरू झाल्याने पुढील चार महिने खाण उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेला खाण उद्योग कालपासून पुढील चार महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी सांगितले.
१ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत राज्यात खनिज उत्खनन तसेच त्याची वाहतूक करता येणार नसल्याचे आचार्य यांनी सांगितले. खाण कंपन्यांना बंदी संदर्भात अधिकृतरित्या आदेश देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. गेल्या ऑक्टोबर २०१६ ते मे २०१७ या काळात राज्यात २५ दशलक्ष टन एवढ्या खनिजाचे उत्खनन करण्यात आले. खनिज रॉयल्टीद्वारे ४०० कोटी रु. एवढा महसूल या दरम्यान सरकारला मिळाल्याची माहिती आचार्य यांनी दिली.
यंदा सरलेल्या काळात ४१ खाण कंपन्या २८ एप्रिलपर्यंत सुरू होत्या. त्यानंतर वाढत्या प्रदूषणाच्या कारणामुळे सोनशी, सत्तरी येथील १२ खाण कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले होते अशी माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी दिली. सदर कंपन्यांनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी घालून दिलेले निर्देश पाळले नसल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना कंपन्या सुरू करण्यास अद्याप अनुमती दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने घातलेली खाणबंदी उठवल्यानंतर खाण खात्याने २१ वेळा खनिज मालाचा इ-ऑक्शनद्वारे लिलाव केला. यंदाच्या मोसमात तीनवेळा ई-लिलावाद्वारे खनिज विकून १४.५० कोटींचा महसूल सरकारला मिळाला. अजून विविध जागी तीन दशलक्ष टन खनिज माल असून त्याचाही इ-लिलाव करण्यात येणार असल्याचे खाण खात्याच्या सूत्रांनी सांगितले.