पावसाने पुन्हा धरला जोर

0
177

>> पुढील तीन दिवस जोरदार पाऊस शक्य

राज्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा जोर धरू लागला आहे. आगामी तीन ते चार दिवस काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. राज्यात आत्तापर्यंत १९ इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोणमध्ये सर्वांत जास्त २४.२ इंच तर म्हापसा येथे सर्वांत कमी १२.७ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात पावसाने जोरदार सलामी दिल्याने शेतीच्या कामांना प्रारंभ झाला.
मागील चार दिवस पावसाने दडी मारल्याने उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते.
राज्यात मोसमी पाऊस कमजोर असला तरी मागील चोवीस तासांत अधुनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पेडणे, ओल्ड गोवा, काणकोण, केपे, सांगे, मुरगाव आदी भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.

चोवीस तासांत कमाल तापमान ३२.८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. आद्रता पणजीमध्ये ९६ टक्के एवढी नोंद झाली आहे.
हवामान विभागाकडून मिळालेली पावसाची माहिती अशी – काणकोण येथे २४.२ इंच, ओल्ड गोवा येथे २२.९ इंच, पेडणे येथे २०.२ इंच., सांगे येथे २०.१ इंच, मुरगाव येथे १९.९ इंच, पणजी येथे १९ इंच, दाबोळी १९.३ इंच, साखळी १५.६ इंच, केपे येथे १५.७ इंच, म्हापसा येथे १२.२ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंडा, मडगाव आणि वाळपईतील पावसाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.