पावसाचा पहिला दिवस!

0
2589

– रश्मिता सातोडकर

कित्येकांच्या नव्या आयुष्याची साक्ष म्हणजे हा पाऊस तर काहींच्या दुःखावर पांघरूण ओढणारा हा पाऊस. नव्या जिवाला पालवी देऊन, अंकुर आणणारा हा पाऊस सर्वांना लाभदायी ठरो हीच इच्छा! या पावसात प्रत्येक मन आनंदानं उभारी घेऊ दे आणि पुढच्या पिढीला तरतरी येण्यासाठी या पावसात, एक तरी झाड लावू दे… 

वैषाखातल्या उन्हाचे चटके सोसून सारी धरती सुसज्ज होते आणि आतुरतेने वाट पाहते त्या चार थेंबांची. मेघांचा तो अनाच्छादित पसारा पाहून मन तृप्त होतं. आकाश भरून आलं की आकाशाच्या अंगणातले मेघ आनंदाने गरजतात आणि आपल्यावर आनंदाच्या अश्रूंचा वर्षाव करतात. पहिल्या पावसाचा तो मोह लावील असा मोहक सुगंध प्रत्येकाच्या मनातल्या कुप्पीला साद घालतो. खरंच, एकांतातसुद्धा आठवतील असे दिवस म्हणजे पर्जन्याचेच! आपल्या अंगणात पडणार्‍या पावसाचे नवल आपल्याला नेहमीच वाटायचे. नेमकं आपले शाळा सुरू होण्याचे दिवस आणि या पावसाचे आगमन ठरलेलेच. वह्या, दप्तरं, छत्र्या यांची खरेदी करतानादेखील आपली पाठ न सोडता याची आपली पिर..पिर.. चालूच. सर्वत्र गारवा पसरवून हरित तृणांची मखमली चादर चढवून आम्हा सर्वांना आशेला लावून जाणार्‍या या पावसाची खोड दुसर्‍या वर्षीच्या ज्येष्ठातच मोडते आणि याच्या येण्याची चाहूल प्रत्येकालाच तारुण्य देते.
आटलेल्या नद्या, विहिरी, ओढे पाण्याने तुडुंब भरतात. प्रत्येकाच्याच चेहर्‍यावरचा आनंद द्विगुणित करत बरसतो हा पाऊस. पण गेल्या दोन-तीन वर्षांत म्हणावा तसा पाऊस गोव्यात पडला नाही. उत्तराखंड, चेन्नई यांसारख्या ठिकाणी रौद्र रूप धारण करून निसर्गाचा कोप आपण पाहिला. पण विदर्भ, कोकण तसाच अनेक ठिकाणी त्याने नमतं पाऊल घेऊन लोकांना शिघेला लावलं. अद्यापही अपेक्षित अशी जलधारा सुरूच झालेली नाही. महाराष्ट्रातले शेतकरी डोळ्यात तेल घालून वरुण देवाची वाट पाहताना दिसतात. शेतकर्‍यांना तर पावसाचाच आधार असतो. भरपूर पीक यावे यासाठी नाही पण निदान एक वेळचे पोट भरता यावे यासाठी तरी पावसाने जोम धरलाच पाहिजे. पाऊस अंगा-खांद्यावर खेळावा आणि आपण त्यात चिंब भिजून जीवनाचा नव्याने आस्वाद घ्यावा हेच पावसामधलं व आपल्यामधलं नातं.
‘पाऊस’ हा शब्द नुसता ऐकला तरीही बालवाडीत शिकवली जाणारी कविता ओठांवर ओघळते. पावसाला आर्ततेने साद घालणार्‍या त्या चार ओळी माणसाच्या ओठात मरेपर्यंत तरी नक्कीच येत असाव्या. पहिल्या पावसातून निर्माण होणारा तो प्रसन्न, आल्हाददायी परिसर, मातीचा ओला सुगंध, झाडांना फुटलेली नवी पालवी, बेडकांचा कर्कश आवाज, पक्षांचा संथ किलबिलाट आणि मध्येच मोरांचा गुंजारव… आहाहा..!! मस्तं वाटतं. अगदी त्रासिक जिवाचा विसर पडून मोहिनी घालणार्‍या जगात वावरल्याचा भास केवळ पाऊसच देऊ शकतो.
आपल्यातल्या प्रत्येकाने पावसाचा अनुभव निरनिराळ्या वयात नक्कीच घेतला असेल. लहान असताना भिजण्यात काय वेगळीच मजा होती. बाई आत शिकवत असताना आपल्या नजरा बाहेरच. घरी आलो की अभ्यास सोडून बाहेर खेळायला जायची स्वप्न बाळगणारे आपण वयापरत्वे पावसात भिजून, टपरीवरचा गरमागरम आलं ठेचून घातलेला चहा आणि गरमागरम भजी या मानसिकतेत वावरू लागतो. पण प्रत्येक वयात पावसाबद्दलची ओढ तशीच कायम टिकून राहते. कित्येकांच्या नव्या आयुष्याची साक्ष म्हणजे हा पाऊस तर काहींच्या दुःखावर पांघरूण ओढणारा हा पाऊस. नव्या जिवाला पालवी देऊन, अंकुर आणणारा हा पाऊस सर्वांना लाभदायी ठरो हीच इच्छा! या पावसात प्रत्येक मन आनंदानं उभारी घेऊ दे आणि पुढच्या पिढीला तरतरी येण्यासाठी या पावसात, एक तरी झाड लावू दे… हाच संकल्प प्रत्येक मनाने करु या!