पालकांनो, शाळेचे मित्र बना!

0
232
  •  दिलीप वसंत बेतकेकर

ज्या ठिकाणी शिक्षक आणि पालक यांची एकमेकांशी केवळ ओळखच नाही तर उत्तम संपर्क, संबंध आणि सहयोग आहे हे मुलांना दिसतं, त्या ठिकाणी मुलांचं शिकणं अधिक चांगलं होतं, अनुशासन छान राहतं.

पालक ही फार मोठी शक्ती आहे. प्रत्येक पालक आपापल्या परीने शाळेला काही ना काही मदत करण्यासाठी पुढे येईल तो दिवस खरंच सोन्याचा. मग व्हाल ना शाळेचे मित्र?

आत्तापर्यंत आपण आपल्या पाल्यासाठी शाळेची निवड करून प्रवेशदेखील घेतला असेल. काहीजणांनी मागच्या वर्षीच्या शाळेतच प्रवेश घेतला असेल तर काहीजणांनी नवीन शाळेत आपल्या मुलांना दाखल केले असेल.

नवीन वर्षासाठी लागणारं साहित्य खरेदी केलं की आपलं काम संपलं, असं मानणारे पालक खूप आहेत. एकदा प्रवेश मिळाला की ‘हुश्श’ करून सुटकेचा सुस्कारा टाकणारे पालकही काही कमी नाहीत. आता ‘आमचं काम संपलं. आता पुढचं जे काही आहे ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पाहून घ्यावं, असा ‘सोयीचा’ विचार करणारे पालक संख्येने खूप असतात. काहींना प्रामाणिकपणे वाटतं की आता मुलांच्या शिक्षणात आणि शाळेत आपली भूमिका नाही.

पालकांचा ‘रोल’ संपत नाही. शाळा आणि घर, शिक्षक आणि पालक मुलाचे दोन पंख आहेत. दोन्ही सक्षम, सशक्त असले पाहिजेत.
पालक-शिक्षक संघ हा वास्तविकपणे पालक व शिक्षकांचा संघ आहे, शाळा आणि पालक यांच्यामधला सेतू आहे. दोघांमधलं नातं, सौहार्दपूर्ण राहिलं, मैत्रीपूर्ण राहिलं तर फक्त शाळेसाठीच नाही तर मुलांच्या दृष्टीनेही खूपच फायद्याचं, हिताचं ठरतं.
अनेक शाळांमध्ये पालक-शिक्षक संघाच्या बैठकीच्या वेळी अगदी वेगळं चित्र पहायला मिळतं. जणू काही दोन एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेल्या शत्रू छावण्यांसारखं चित्र असतं. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. अशा परिस्थितीत शाळेचं आणि पालक-पाल्यांचंही नुकसान होतं ही गोष्ट ध्यानात येत नाही.
हे नुकसान टाळण्यासाठी आणि मुलांच्या कल्याणासाठी शाळा आणि घर, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये चांगले संबंध हवेत. पालकांनी शाळेचे मित्र, सहयोगी बनलं पाहिजे. याचा अर्थ शाळा व शिक्षक यांच्या काही चुका झाल्या तर निमूटपणाने गप्प रहायचं असा नाही. चुका लक्षात आणून देण्याची पद्धत ठीक हवी. अनेक वेळा बोलताना शब्दांपेक्षा ‘स्वर’ अधिक नुकसान करतो, भाषेपेक्षा भाव नुकसान करतो. हे आपलंच नुकसान टाळण्यासाठी थोडं संयमाने, शांतपणे, विचारपूर्वक शाळेशी, शिक्षकांशी सहयोगी होण्याचा थोडा प्रयत्न केला तर खूप उपयोग आहे.
पालक मित्रांनो, एक गोष्ट कदाचित आपल्या लक्षात आली नसेल. आपण मुलांच्या शिक्षणासाठी जेवढी फी भरता तेवढ्या फीमधून शिक्षणाचा खर्च होऊ शकत नाही. शासन म्हणजे सरकार आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक खर्च आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी करत असतं. पण जो खर्च सरकार करतं तेवढ्यानंही आपल्या मुलांचं शिक्षण होऊ शकत नाही. शाळेचं मॅनेजमेंटही खूप खर्च करत असतं. आणि अनेक शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापकही आपल्या परीनं शाळेतील विविध उपक्रम आणि कार्यक्रमांसाठी साहित्य आणि धन गोळा करत असतात. पण फार कमी पालकांना याची माहिती आणि जाणीव असते.

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कितीतरी लोक हातभार लावत असतात हे विसरू नका आणि मुलांनाही याची जाणीव करून द्या.
मग आपणही अधिकाधिक सहयोग करायला नको का? ही कृतज्ञतेची भावना आपल्या मनात हवीच आणि मुलांमध्येही ती रुजवायला हवी. अन्यथा मुलं कृतघ्न बनतील. हे पालकांनाही परवडणारं नाही, उलट धोक्याचं आहे.
शाळेचे पालकांनी मित्र किंवा सहयोगी बनावे याचा अर्थ केवळ आर्थिक सहयोग असं अपेक्षित नाही. वेळेचं योगदान हे सर्वांत महत्त्वाचं योगदान. मुलांसाठी शाळा ज्यादा ‘क्लासेस’ची योजना आखते. दहावीच्या मुलांसाठी तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रात्री नऊ वाजेपर्यंत शाळेत अभ्यासाला ठेवून घेतात. अशा वेळी शिक्षकांच्या बरोबर आलटून पालटून काही पालकही शाळेत सोय आणि सवडीनुसार तास, दोन तास आले तर उत्तमच.

पैशांपेक्षाही कितीतरी महत्त्वाच्या आणि मौल्यवान गोष्टी पालक करू शकतात. पालकांपाशी अनेक कामं, कौशल्यं, गुण, माहिती, ज्ञान, अनुभव असतात. हे सगळं शाळेला, मुलांना उपयुक्तच आहे. अगदी न शिकलेले आईवडीलही शाळेचे उत्तम मित्र बनू शकतात. त्यासाठी हवी फक्त इच्छा आणि सकारात्मक वृत्ती.
ज्या ठिकाणी शिक्षक आणि पालक यांची एकमेकांशी केवळ ओळखच नाही तर उत्तम संपर्क, संबंध आणि सहयोग आहे हे मुलांना दिसतं, त्या ठिकाणी मुलांचं शिकणं अधिक चांगलं होतं, अनुशासन छान राहतं. ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट. शिक्षकांनी एक पाऊल पालकांच्या दिशेनं उचललं किंवा पालकांनी एक पाऊल शिक्षकांच्या दिशेनं उचललं तर कितीतरी गोष्टी सोप्या आणि चांगल्या होतील.

विशेषतः विद्याभारतीच्या शाळांमध्ये पालकांच्या सहभागाचा आणि सहकार्याचा खूप आग्रह धरला जातो. कारण पालक ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीचा विधायक उपयोग कसा करून घेता येईल यावर खूप चर्चा, विचार होत असतो. अनुभवही चांगला आहे. पण प्रत्येक पालक आपापल्या परीने शाळेला काही ना काही मदत करण्यासाठी पुढे येईल तो दिवस खरंच सोन्याचा. मग व्हाल ना शाळेचे मित्र?