पार्सेकर सरकारचा पाठिंबा मगोने काढला

0
86

>> मगो लढविणार २२ जागा : सुदिन ढवळीकर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

 

अखेर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने राज्यातील भाजपप्रणित सरकारला दिलेला पाठिंबा काल अधिकृतपणे काढून घेतला. ठरल्याप्रमाणे काल महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा व सभापती अनंत शेट यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे कळविले. दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या निवडणुकीनंतर सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगून आपला पक्ष २२ जागा तर गोवा सुरक्षा मंच उरलेल्या जागा लढविल, अशी माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

सुदीन ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली मगो पक्षाची निवडणूक समिती स्थापन करून दि. ११ पर्यंत उमेदवार निश्‍चित करणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
फोंडा, मडकई, प्रियोळ, शिरोडा, पेडणे, मांद्रे, म्हापसा, दाबोळी, वास्को, मुरगांव, डिचोली, सांतआंद्रे, दाबोळी, वाळपई, सावर्डे, कुडचडे, मयें, काणकोण, या १८ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे यापूर्वीच निश्‍चित केले होते. मगोला जनतेचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा सुरक्षा मंचला अद्याप चिन्ह मिळालेले नाही. पुढील दोन दिवसात ते मिळू शकेल. त्यानंतर गोवा सुरक्षा मंचबरोबर बैठक घेऊन जागा वाटप प्रक्रियेस अंतिम रूप दिल्यानंतर अधिकृतपणे युतीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
भाजपला युतीची दारे बंद
आपल्या पक्षाने आता भाजपासाठी दारे बंद केली आहेत, असेही ढवळीकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. गोवा प्रजा पार्टीशी आपल्या पक्षाचा संबंधच नाही. डिचोलीतून मगोच्या तिकीटावर नरेश सावळ निवडणूक लढवतील असे ढवळीकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. दरम्यान मगो आमदार लवू मामलेदार यांनी काल गोवा हस्तकला विकास महामंडळ व राजीव गांधी कला मंदिराच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
निवडणुकीनंतर भाजपशी
युतीच्या प्रश्‍नाला बगल
निवडणुकीनंतर भाजपशी युती केली जाण्याची शक्यता आहे काय असे विचारले असता ढवळीकर यांनी ‘थेट उत्तर देणे देणे टाळले. ते म्हणाले, ‘आम्ही ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहोत आणि अधिकाधिक उमेदवार निवडून आणणे हे आमचे लक्ष्य आहे.’ मगो-गोवा सुरक्षा मंच युतीत शिवसेनाही सहभागी होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.मगोने पार्सेकर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सत्ताधारी गटाची आमदारसंख्या २३ वर आली आहे. त्यात २१ भाजपचे तर दोन अपक्ष आहेत. मात्र मगोने पाठिंबा काढल्याचा सरकारवर परिणार होणार नाही. अलीकडील काळात मगोचे मंत्री दीपक व सुदिन या ढवळीकर बंधूंनी सातत्याने आक्रमकतेने सरकारवर जाहीर टीका सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उभयतांना मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. मात्र मगोला त्यानंतरही येत्या निवडणुकीसाठी भाजपची दारे खुली असल्याचे मुख्यमंत्री पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले होते. कोणतेही प्रशासकीय निर्णय घेताना मुख्यमंत्री पार्सेकर मगोच्या मंत्र्यांना विश्‍वासात घेत नव्हते असा आरोपही उभय मगो मंत्र्यांनी केला होता. तसेच पार्सेकर यांना मुख्यमंत्री केल्याने गोवा दहा वर्षे पिछाडीवर गेल्याचा दावाही त्यांनी केला होता.