पार्किंग समस्या देशासमोरील महासंकट

0
297
  • देवेश कु. कडकडे

पार्किंगच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रशासन अपेक्षित प्रयत्न करताना दिसत नाहीत. ते समस्येप्रती गंभीर नसल्याचे दिसते. वाहतूक खात्याने कडक धोरण अवलंबले तरच लोकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण होईल.

गोव्यातील महामार्ग मृत्यूचे सापळे बनले आहेत. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. पार्किंग व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि युवा वर्गाकडून होणारी बेशिस्त वाहतूक ही सर्वांसाठी आज मोठी डोकेदुखी बनली आहे.
आज देशासमोर पार्किंग व्यवस्थेचे महाभयंकर संकट उभे राहिले आहे. भविष्यात यातून कायदा सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता दिवसेंदिवस दृढ होत आहे. बेकायदा पार्किंगच्या माध्यमातून आज भारतीय शहराच्या व्यवस्थेचा कुरूप चेहरा समोर येत आहे. भारतीय प्रशासकीय क्षेत्रातील व्याप्त भ्रष्टाचार आणि अक्षम्य बेपवार्र्ई म्हणून देशभरातील नागरिक पार्किंगच्या समस्येने त्रस्त आहेत.
गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत सर्वत्र रस्ता जाम. रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्यांचीच गर्दी दृष्टीस पडते. जणू देशात चिंताजनक ढंगात निरंतर अवैध पार्किंगचा एक धंदाच फोफावतो आहे. सकाळी आणि संध्याकाळी या महत्त्वाच्या वेळी वाहतूक पोलीस जास्तीत जास्त ठिकाणी असावेत, अशी नागरिकांची मागणी असते. मात्र, पोलिसांच्या कमी संख्येमुळे वाहतूक पोलीस सर्व महत्त्वाच्या ठिकाणी असू शकत नाहीत हे वास्तव आहे.
आज प्रत्येक शहर, गावातील, कुटुंबातील सदस्यांकडे आपापले वेगळे वाहन असते. गाव किंवा शहरातील वाहतुकीसाठी दुचाकी तर लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी चार चाकी वापरण्याचा बहतेकजणांचा कल असतो. आज मध्यमवर्गीयांकडे पैसा खुळखुळत असल्यामुळे किंवा बँकेचे कर्ज सहज उपलब्ध होत असल्यामुळे वाहन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
पती पत्नी आपल्या दोन मुलांना दुचाकीवरून घेऊन जाताना रतन टाटा यांनी पाहिले. त्यांची ती केविलवाणा अवस्था पाहून मध्यमवर्गीयांना स्वस्त दरात चारचाकी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आणि त्यातून नॅनो कार आकाराला आली.
वास्तविक आपल्याकडे प्रथम वाहन विकत घेतले जाते आणि पार्किंग सारख्या महत्त्वपूर्ण बाबीवर नंतर विचार केला जातो. जशी लोकसंख्या वाढते, तशी वाहनांची संख्याही वाढत आहे. आम्ही कळत नकळत अनेक समस्या स्वतःच अंगावर ओढून घेतो आहोत. नागरिकांना आपल्या काही सवयी आणि ढंग बदलावेच लागतील, कारण अनेकजण मागचा पुढचा विचार न करता सहजपणे व्यवस्थितरीत्या रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून आपले काम उरकण्यात जातात. मग रस्ता ‘जाम’ होतो वा पादचार्‍यांना त्याचा त्रास होतो. मात्र, त्यांना त्याची मुळीच पर्वा नसते. त्यातून अनेक अनावश्यक भांडणे होतात. त्याचे पर्यवसान मारामारीत होते.
पार्किंग आणि त्याच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी समस्येमुळे अनेकवेळा कठीण परिस्थितीला सामोेरे जावे लागते. याच वाहतूक कोंडीमुळे वेळेत इस्पितळात न पोचल्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत, तसेच अनेकजण रेल्वे स्टेशन, विमानतळ, ऑफीस, शाळा अशा महत्त्वाच्या ठिकाणी वेळेवर पोचू शकत नाहीत.
देशात कोट्यवधी तणावग्रस्त व्यक्ती प्रत्येक क्षणी निरंतर रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे तळमळत असतात त्यामुळे एक भयंकर तर्‍हेची चिडचिड आणि तणाव निर्माण होतो. त्यामुळे अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. आज अनेकांचा बहुमूल्य वेळ हा रस्त्यावर वाया जातो. भरीस प्रदूषण आणि किंमती इंधनाची नासाडी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी सूर्योदय होण्यापूर्वी घरातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडतात.
पार्किंगच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रशासन अथवा वाहतूक नियोजन विभाग अपेक्षित प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यांच्या कार्यशैलीवरून ते समस्येप्रती गंभीर नसल्याचे दिसते. पोलीस, परिवहन किंवा वाहतूक खाते यांनी कडक धोरण अवलंबले तरच लोकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण होईल.
देशात अशाच प्रकारची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे की जेणे करून लोक खासगी वाहनांचा उपयोग मोजक्याच वेळी करतील. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची आवश्यकता आहे. देशात विविध शहरांत तासांच्या हिशेबानुसार पार्किंग शुल्क आकारले जावे. जेणे करून यामुळे लोक खासगी वाहनांचा उपयोग कमी करतील. तसेच रस्तेही स्वच्छ आणि सुरक्षित करावेत. यामुळे काहंी लोक पायी चालणे आणि सायकल चालवणे पसंत करतील.
लोकांनी आता वाहन छंद म्हणून नव्हे तर आवश्यकता म्हणून वापरावे. आणि विकसित देशांप्रमाणे भारतीय नागरिकांनाही आता जास्त वेळ पायी चालणे आणि सायकलचा प्रयोग करण्याची सवय लावावी. यामुळे पर्यावरण, इंधन बचत, पार्किंग समस्या आणि नागरिकांचे स्वास्थ्य उत्तम राहील. शहरात मल्टीलेव्हल पार्किंग हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. पणजी शहरात असे मल्टीलेव्हल पार्किंग उभारण्यात आले आहे, परंतु त्याला आजवर अल्प प्रतिसाद मिळत आला आहे.
पार्किंग समस्या आज सर्वच शहरांमध्ये अत्यंत उग्र रूप धारण करीत आहे. त्याचबरोबर आज पार्किंगमुळे सार्वजनिक स्थळी, सोसायटीमध्ये दररोज भांडणे, मारामार्‍या होतात, तर दिल्लीसारख्या शहरांमध्ये काही वेळा पार्किंगवरून झालेल्या बाचाबाचीतून खून झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पार्किंगच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास प्रत्येक नव्या इमारतीमध्ये पुरेशा पार्किंगसाठी जागा आरक्षित करणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. कायद्यात तशी तरतूद आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे समस्या निर्माण होत आहे.
दरम्यान, वाहतुकीचे साधे नियम सरार्सपणे पायी तुडवणार्‍या वाहन चालकांवरही लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा विचार वाहतूक खात्याने गोव्यात चालवला आहे. पणजीसारख्या शहरात असे सीसीटीव्ही बसवलेले आहेत. इतर शहरांमध्येही ते बसवण्याचा सरकारचा विचार आहे. कोणतेही वाहन रस्त्यावर उभे न करणे, यातून वाहन चोरीलाही आळा बसेल. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण याचे भान विसरता कामा नये. आपण पार्किंग समस्येविषयी जनतेने अनुकूल आचरण केले तर या समस्येतून थोडा फार दिलासा मिळेल.