पाण्याच्या संकटावर मात करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

0
144

>> ‘मन की बात’मधून सुचविले उपाय

देशातील कोट्यवधी लोकांना देशात विकास झालेला हवा असल्याने त्यासाठीच या जनतेने आपल्याला देशसेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात व्यक्त केली. कालपासून हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे.

पुन्हा देशसेवेची संधी दिल्याबद्दल मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी जल संरक्षणाच्या महत्वाकडे लक्ष वेधले. सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये पाणी प्रश्‍न गंभीर बनला असल्याने सर्वांनी पाणी संवर्धन करणे अत्यावश्यक बनल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतील असे ते म्हणाले. लोकसहभाग आणि सहकार्य यांच्या आधारे पाणी संकटावर मात करण्याच्या विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रपट क्षेत्र प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने या क्षेत्रातील लोकांनी आपपल्या पध्दतीने पाणी वाचवण्याची मोहीम हाती घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. पाण्याच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे पाण्याच्या संकटाशी संबंधित निर्णय तातडीने घेतले जातील असे त्यांनी सांगितले.
ज्या प्रकारे देशवासियांनी स्वच्छता अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठी जनआंदोलनाची सुरुवात करायला हवी. देशात असलेल्या जल संरक्षणाच्या पारंपरीक पध्दती लोकांनी एकमेकांपर्यंत पोचवायला हव्यात. जल संरक्षणाचे काम करणार्‍या कोणाही व्यक्ती किंवा संघटनेला आपण ओळखत असल्यास लोकांना त्याची माहिती द्यावी अशा सूचना मोदी यांनी आपल्या भाषणात केल्या आहेत.