पाणी पुरवठ्यासाठी मास्टर प्लॅन तयार

0
99

>> जलसंसाधन मंत्र्यांची विधानसभेत माहिती

राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करता यावे यासाठी जलसंसाधन खात्याने छोटी, मध्यम आकाराची धरणे व बंधारे बांधण्याबरोबरच पाण्यासाठीचा एक मास्टर प्लॅनच तयार केला आहे, अशी माहिती जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी काल विधानसभेत दिली. म्हादई, जुवारी, तळपण व गालजीबाग या चार नद्यांतील पाणीही व्यवस्थितपणे वितरीत करता यावे यासाठी ते साठवून ठेवण्याची योजनाही तयार करण्यात येणार असल्याचे पालयेकर यांनी यावेळी सांगितले. पाण्यासाठीचा मास्टर प्लॅन हा दीर्घकाळासाठीचा असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रश्‍नोत्तराच्या तासाला कॉंग्रेस आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. राज्यातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्‍न मोन्सेरात यांनी उपस्थित केला होता. राज्यातील शेती व उद्योगांना किती पाणी लागते व जनतेला पिण्यासाठी किती पाणी लागते याची आकडेवारी खात्याकडे उपलब्ध आहे काय, असा उपप्रश्‍नही मोन्सेरात यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र, ती माहिती आपल्याकडे नसल्याचे पालयेकर यांनी यावेळी सांगितले. उद्योग व पिण्यासाठीचे पाणी वितरीत करण्याची जबाबदारी ही जलसंसाधन खात्याची नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तिळारी धरणाचे कामही सुरू आहे. विर्डी येथील काम शिल्लक आहे. सुमारे १० कि. मी. चे काम शिल्लक असून त्यावर १२० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हे यावेळी बोलताना म्हणाले की, दक्षिण गोव्यातील केपे, सांगे, कुंकळ्ळी आदी भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. या वेळी हस्तक्षेप करताना पाणीपुरवठा खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की नेत्रावळी येथे २३ कि. मी. अंतरावर जलवाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाले की केपे येथील पाणी समस्या दूर होऊ शकेल. जायकाचे काम मंदगतीने सुरू असल्याचा आरोपही यावेळी बाबू कवळेकर यांनी केला. यावेळी उत्तर देताना जायकाचे काम २०१९ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे खात्याने उद्दिष्ट ठेवले असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले. शेतकर्‍यांना पाणी टंचाईचा प्रश्‍न भेडसावतो आहे, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. शेतकर्‍यांना भेडसावणारी पाणी टंचाई समस्या कशी दूर कराल, असा प्रश्‍न त्यांनी यावेळी जलसंसाधन खात्याचे मंत्री पालयेकर यांना केला. खात्याकडून माहिती मिळवून तुम्हाला सांगतो, असे पालयेकर उत्तरले.