पाणी … जीवनसत्व!!

0
645

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
पाणी हा विषय एकदम साधा, त्यावर काय लिहावे? पाणी हे यथार्थाने जीवन आहे. जीवाचे मूळ पाण्यात सापडते. शास्त्रज्ञ मंगळावर किंवा कुठल्यातरी उपग्रहावर पाणी शोधत असतात. कारण कुठेही पाणी असणे म्हणजे तिथे जीवाचा उगम झाला आहे असे समजायचे.
पाण्याला कुणी नीर म्हणतात, कुणी जीवन, कुणी एच२ओ तर कुणी उदक, पण जगण्यासाठी पाणी हे हवेच!! प्रेमाशिवाय माणसे जगतात, खाण्याशिवायही जगू शकतात पण पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. पाणी हा आपल्या जीवनाचा एक घटक आहे.
पाणी कुठे सापडते…?
सागरात, नद्यांत, ओहोळात, झर्‍यात, तळ्यात, टाक्यांत, विहिरीत, धरणात, कालव्यात…. पावसाचे… शेवटी ते नळांत येते. चांगले पाणी हे चांगल्या आरोग्याचे चिन्ह आहे.
पाण्याविषयी अंधश्रद्धा पुष्कळ आहेत. वाहते पाणी चांगले. स्तब्ध पाणी आरोग्यास घातक आहे, अशी वावडी आहे. विहीर बांधून झाल्यावर गावात तिला उजवतात. पूजा-पाठ करून मगच तिचे पाणी प्यायला सुरुवात होते. सत्तरी गावात न उजवलेल्या कित्येक विहिरी आहेत ज्यांचे पाणी लोक पीत नाहीत… व जवळच नदीचे वाहते पाणी घरी पिण्यासाठी घेऊन जातात.मी एकदा भारत सरकारच्या आरोग्य विषयक तुकडीसवे ओरिसाला गेलो होतो. तिथे मी आरोग्याविषयीचा धडाच घेतला. तिथे लोक ट्यूबवेलवर आंघोळ करत होते व हिराकूड धरणाच्या कालव्याचे पाणी पिण्यासाठी नेत होते.
कुठले पाणी आरोग्याच्या दृष्टीने चांगले व कुठले पाणी वाईट याविषयी विचारपूर्वक कथन होणे गरजेचे आहे. मी असे म्हणेन, कुठलेही पाणी पिण्याजोगे नाही! पाण्यात निसर्गतः विविध अशुद्ध घटक असतात, ते पाण्यात एकजीव झालेले असतात जसे एच२एस, सीओ२, अमोनिया, नायट्रोजन, इ. तर पाण्यात वरवर दिसणार्‍या गोष्टी – चिखल, वाळू, वगैरे व झाडे व जीव. या सगळ्या गोष्टी पाण्यात निसर्गातून आलेल्या आहेत. मग त्या हवेतून, जमिनीतून किंवा जवळच्या आसपासच्या जागेतून येणार्‍या असोत. पाण्यात क्षारही असतात- कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सोडियम.
पण पाणी घातक बनवणार्‍या वस्तू मानव तयार करतो. मग त्या कोणत्या…?
१) सेवेज – मल- ज्यात घाण व शरीरास घातक असणारे जीव-जिवाणू असतात.
२) कारखान्यातून बाहेर पडणारे घातक पाणी (त्यात विषारी घटक आढळून येतात.)
३) शेतीविषयक गोष्टी जसे खतं, जंतुनाशकं…
४) उष्ण आणि किरणोत्सारीत घटक.
हे दूषित पाणी आम्ही पितो किंवा आमच्या खाण्यातून हे पाणी आमच्या शरीरात जाते.
बघा, वाचा व मग विचार करा…
गावात सकाळी सकाळी शौच्यास आम्ही नदीवर जातो… तोंडात दातुन घेऊन आम्ही बसतो. मग साफसफाई झाल्यावर नदीच्या पाण्याने तोंड धुतो. घाटावर तर ज्जा असते. दाटीवाटीने बायका कपडे धूत असतात. शेजारीच कुणीतरी आपल्या म्हशी धूत असतो… तर कुणी आपली स्कूटर, कार किंवा मालवाहू ट्रक धूत असतात. जवळच मुलं आंघोळ करतात… आम्ही पण शेजार्‍याबरोबर बाहेरगावातून आलेल्या नातलगांबरोबर आंघोळ करतो. मनमुराद पोहतो… पोहता पोहता ‘‘चूळ’’ भरतो. बायका घागरी घेऊन, पाणी भरून घरी घेऊन जातात.
हो ना, मग बघा, हे पाणी पिण्यायोग्य आहे का? गावात पाणी गरम करून कोण पितो का? आम्ही गोवेकरी बाहेरगावी गेल्यावर हॉटेलात गरम पाणी आणायला सांगतो… व तिथले वेटर आम्हाला कपाळावर आठ्या घालून बघत राहतात. गावात सर्वजण थंड पाणीच पितात. मग ते कुठलेही असू दे. आम्ही ते पीत नाही. बिसलरीच्या पाण्याची बाटली मागवतो… हॉटेलचे पेले घेतो, त्यात ते पाणी ओततो व मग पितो. बरोबर आहे..? ते पेले त्या मुलाने आपल्या न धुतलेल्या हाताने चक्क आत बोटं घालूनच आणलेले असतात… मग आम्ही ते बिसलरीचे पाणी पितो… दुसर्‍या दिवशी हगवण लागते! तुम्ही कुठे चुकलात?
आमच्याकडेही कित्येक लोक नळाचे पाणी पितात. आता हे नळाचे पाणी जे सरकार पुरवते ते तरी स्वच्छ आहे का? यावर मग बोलू!
आमच्या गोव्यात पिण्याखातर पाणी उपलब्ध आहे असे आपण मानतो. तरीदेखील दुर्गम भागात पिण्याचे पाणी (स्वच्छ, योग्य उपचार केलेले) मिळत नाही.
गावातले लोक विहिरीचे, झर्‍याचे, तळ्याचे, नदीचे पाणी वापरतात. डोंगरातील झर्‍याचे पाणी स्वच्छ असते असे कुणी म्हणू नये, कारण रानटी जनावरे ते नेहमी अस्वच्छ करत असतात. तळ्याचे पाणी स्तब्ध असल्याने त्यात बुरशी, छोटी छोटी झाडे, शेवाळ ते अस्वच्छ करतात. वाहते पाणी हे केव्हाच शरीराला पोषक असत नाही. विहिरीचे पाणी स्वच्छ असू शकते. विहिरी चांगल्या बांधलेल्या असल्या तर विहिरीत फक्त खालून पाणी पाझरते तर ते बरे असते.
कुठलेही पाणी पिण्याअगोदर ते पिण्याजोगे आहे का?.. हे कोणी तपासून बघितले आहे का? जर तुम्ही पाणी गरम करून, चांगले उकळून.. मग थंड करून पीत असाल तर गरजच नाही. पण हे करत नसाल तर कुठलेही पाणी तपासून पहा म्हणजे करून आणा. आरोग्यखाते ते तुम्हाला करून देईल. विहिरीचे पाणी पीत असाल तर दरवर्षी विहीर साफ करा. विहिरीचे तोंड झाका, त्यावर झाकण बसवून घ्या. तळ्यात पिण्याचे पाणी घेण्यासाठी वेगळी जागा निवडा नि धुणी धुण्यासाठी वेगळी! नळाचे पाणी हे नेहमीच स्वच्छ असते हे विसरा. नळाचे पाणी घेऊन येणारे पाईप गंजले तर नाही ना? त्यात चिखल, मल तर साचून राहिला नाही ना? नळाचे पाईप, घाण वाहून नेणार्‍या गटाराखालून तर जात नाहीत ना?
कुणी नळाचे पाणी तपासून घेतले आहे का? कुणीच नाही! मी पण नाही! पण मी पाणी गरम करून पितो. मी नवीन कंपनीचे प्रख्यात फिल्टर्स बसविलेत. त्यात अल्ट्रा व्हायोलेटची किरणे व्हायरसलाही मारून टाकतात. तेव्हा नळाच्या पाण्यावर बिलकूल विश्‍वास न ठेवता आम्ही फिल्टरचे पाणी पिण्यासाठी व जेवणासाठीही वापरतो. कित्येकांना ते शक्य नाही. तेव्हा पाणी कोणतेही असू द्या… पाणी गरम, उकळल्यावरच प्या!!
दूषित पाण्यापासून होणारे रोग…
१. व्हायरल – पोलिओ, हिपॅटायटीस.
२. जिवाणू (बॅक्टेरिया)- कॉलरा, टायफॉइड, पॅराटायफॉइड, डिसेंट्री, डायरिया.
३. प्रोटोझोआ – अमिबिक डिसेंट्री.
४. जंत – राऊंडवर्म, थ्रेडवर्म, हूकवर्म.
५. सायक्लॉप्स – गिनीआवर्म इन्फेक्शन
दूषित पाण्यापासून होणारे आजार नेहमी आम्हाला होताना आढळतात. कधी कधी वाड्यातल्या प्रत्येक घरात हे रुग्ण आढळतात. हे आजार लोकांना घरी ठेवतात. कितीतरी कामाचे तास बुडतात. सरकारचे पैसे खर्च होतात. सरकारी इस्पितळात रुग्णांची रांग लागते. खाटा अपुर्‍या पडतात. १०८ ची गाडी प्रत्येक रुग्णाला घेऊन दरवेळी पणजीला जीएमसीकडे घेऊन जाते. रुग्णाचे व त्यांच्या नातलगांचे हाल होतात.
सरकार स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास समर्थ ठरत नाही. नळाचे पाणीच स्वच्छ अशी खोटी आशा बाळगून लोक ते पीत असतात. व पाणीपुरवठा करणारे आरामात झोपा काढतात. हे काही बरोबर नाही. सध्या पाणी महाग झालेले आहे व डॉक्टरांची फी, औषधेही महाग झालेले आहेत. तेव्हा स्वतःच्या आरोग्याची जर योग्य निगा राखायची असेल तर स्वच्छ पाणी प्या. काळजी घ्या.