पाठिंबा हवा

0
94

लष्करप्रमुखांना राजकीय वादामध्ये ओढून त्यांना ‘सडक का गुंडा’अशी उपमा देणारे कॉंग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांना राहुल गांधी यांनी बेंगलुरूच्या सभेत अखेर फटकारले. ते केले नसते तर कॉंग्रेसचीच देशात छीः थू झाली असती. भारतीय सेनेचे मनोबल उंचावण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी पुढे सरसावणार्‍या संदीप दीक्षित यांच्यासारख्या उठवळ नेत्यांनी जरा आपल्या जिभेला लगाम दिल्यास बरे होईल. लष्कराकडे राजकीय दृष्टीने पाहणे गैर आहे, मग ते कॉंग्रेसजनांकडून असो वा भारतीय जनता पक्षाकडून. सैन्याला त्याचे काम करू द्यावे. सरकारने सैन्याला मुक्तहस्त दिलेला आहे त्यानुसार देशाच्या सीमांचे रक्षण करण्याचे कर्तव्य आपली सेना इमानेइतबारे करते आहे. दिवसेंदिवस सैन्यावर हल्ले होतच आहेत. अशावेळी त्यांना धीर देणार, त्यांच्या सैनिकांच्या शहादतीला सलाम करणार की, भलते प्रश्न विचारून त्यांना अपमानीत करणार? सरकारे येतात नि जातात. भारतीय सैन्यदले सातत्याने देशरक्षणाचे कर्तव्य निभावीत आली आहेत. राजवटी बदलल्या, तशी धोरणे बदलली, परंतु सैन्याची देशाप्रतीची निष्ठा, लोकशाहीप्रतीची निष्ठा आणि आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रतीची जाणीव कधी बदललेली नाही. भारतासाठी खरे तर हे भूषण आहे. शेजारील पाकिस्तानसारख्या देशामध्ये वारंवार होणारे लष्करी उठाव आणि सत्तांतरे पाहिली तर आपली सेना किती शिस्तबद्ध आणि देशनिष्ठ आहे याचे दर्शन घडते व अभिमान वाटतो. हा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या ह्रदयामध्ये जागला पाहिजे. जागवला गेला पाहिजे. लष्कर बोलत नसते, कृती करीत असते हे खरे, परंतु लष्करप्रमुखांना अधूनमधून आपल्या सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी काही जाहीर विधाने करावी लागतात, परंतु ती राजकीय कारणांसाठीच केली गेली आहेत असे म्हणता येत नाहीत. त्यांचा तसा अर्थ काढणे चुकीचे आहे. लष्करप्रमुख पाकिस्तानला उद्देशून काही बोलले आणि आपल्या सैन्यसज्जतेचा त्यांनी त्यात उल्लेख केला, तर त्यात दीक्षितांचा पापड का मोडावा? त्यामुळे लष्करप्रमुखांच्या विधानांना राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये पाहून ते जणू आपल्या भाजपा सरकारसाठी ही वक्तव्ये करीत आहेत अशा प्रकारे त्यांच्यावर टीकेची झोड उठवणार्‍या दीक्षित यांना नंतर आपली चूक उमगली. माफी मागून ते मोकळे झाले, परंतु तत्पूर्वी जी असभ्य भाषा त्यांनी वापरली त्यातून केवळ लष्करप्रमुखांचा नव्हे, तर देशाच्या पंधरा लाख सैनिकांचा अपमान झालेला आहे, त्याचे काय? राहुल गांधींनी त्वरित त्या विधानांपासून फारकत घेतली. तेवढे शहाणपण त्यांनी दाखवले, कारण ते दाखवले नसते तर जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागला असता. त्यामुळे राहुल यांनी आपले हात तर वेळीच वर केले, परंतु त्यामुळे पक्षाची मलीन झालेली प्रतिमा काही त्यांना सुधारता येणे शक्य नाही. राजकारण्यांनी लष्कराच्या विरोधात बोलणे गैर आहे. आक्षेपार्ह आहे. जे सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून प्रतिदिन लढत आहेत, शहीद होत आहेत, दहशतवाद्यांच्या कारस्थानांना दुर्दैवीरीत्या बळी पडत आहेत, त्यांच्या पाठीशी आपण उभे राहणार की त्यांचेच पाय ओढणार? दुर्दैवाने आपल्या देशात अशा पाय ओढणार्‍या राजकारण्यांची कमी नाही. काश्मीरमध्ये लिटल गोगोईने आपल्या जीपला एका गुंडाला काय बांधले, मानवाधिकारांचे हनन झाल्याचा आरडाओरडा करीत काही राजकीय मंडळी बाह्या सरसावून बिळांतून पुढे आली. आपल्या क्षुद्र राजकीय लाभातोट्यासाठी लष्करासारख्या व्यवस्थेचा वापर करण्याची ही जी वृत्ती राजकारणी दाखवीत आहेत ती निषेधार्ह आहे. आज संपूर्ण देशाने एकदिलाने आपल्या सैन्यदलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यांना धीर दिला पाहिजे. लढण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्यासाठी अवघा देश एका सुरात एका तालात बोलला पाहिजे.