पाच वर्षांपर्यंत मुलांना शिक्षणाच्या बेडीत अडकवू नका : राज्यपाल

0
95
आनंददायी बाल शिक्षण अधिवेशनाचे उद्घाटन करताना राज्यपाल मृदुला सिन्हा, सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, डॉ. प्रमोद सावंत, रमेश पानसे, सौ. सुरेखा दीक्षित. (छाया : संतोष मळीक)

आनंददायी बालशिक्षण परिषदेचे उद्घाटन
पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांना शिक्षणाच्या बेडीत अडकवून त्यांचे नुकसान करू नका, असे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सांगितले.
साखळी येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आनंददायी बालशिक्षण परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. गोमंतक बालशिक्षण परिषद, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, गोवा राज्य भाषा संचालनालय आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.हा काळ मुलांना मुक्तपणे खेळण्याबागडण्यासाठी द्या, या काळातच मुलांवर चांगले संस्कारही करता येतात असे त्या म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गोवा विधी मंडळाचे सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष रामचंद्र गर्दे, गोमंतक बालशिक्षण परिषद अध्यक्ष सुरेखा दीक्षित आणि महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे अध्यक्ष रमेश पानसे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना सभापती राजेंद्र आर्लेकर म्हणाले की, चांगल्या व सुसंस्कारीत शिक्षणासाठी चांगल्या साधन सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. आजचे शिक्षण विद्यार्थी केंद्रीय बनत असून ही स्वागतार्ह बाब आहे. वास्तविक घर हेच बालकाचे पहिले विद्यालय असते. अक्षर ओळखीशिवाय तेथे होणारे संस्कार हेच शिक्षण असते, असे ते म्हणाले. स्वागत करताना आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसीय विचार मंथनातून इश्ट परिणाम साधले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागत समितीचे अध्यक्ष अनंत शेट यांनी बालशिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया असल्याचे प्रतिपादन केले. कार्याध्यक्ष रामचंद्र गर्दे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन शुभदा सावईकर यांनी केले.