पाचव्या दिवशी ६९ उमेदवारी अर्ज

0
153

>> जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत ९० अर्ज

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी ६९ जणांनी आपले उमेदवारी अर्ज संबंधित निर्वाचन अधिकार्‍यांकडे काल दाखल केल. उत्तर गोव्यातून ४५ आणि दक्षिण गोव्यातून २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अजून दोन दिवस शिल्लक असून या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी वाढणार आहे.
उत्तर व दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत ९० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात उत्तर गोव्यातून ५४ आणि दक्षिण गोव्यातून ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत डिचोली येथे भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केले आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या उमेदवारांनी डिचोली येथे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा पंचायतीसाठी भाजप, कॉंग्रेस, मगोप, आम आदमी या राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याचे काम सुरूच आहे. या राजकीय पक्षांनी काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित केलेली नाही. भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस लागली आहे. उमेदवारी नाकारल्याने नाराज बनलेल्या काही जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भ जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजप, कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

८ मतदारसंघातून
एकही अर्ज नाही
जिल्हा पंचायतीच्या ५० पैकी ८ मतदारसंघात मागील पाच दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या शिरसई आणि खोर्लीमध्ये एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या शिरोडा, कोलवा, बाणावली, गिरदोली, सांकवाळ आणि पैंगीण या सहा मतदारसंघांतून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.