पाचवा सामना टीम इंडियाने जिंकला

0
110

सहाव्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी व १०७ चेंडू राखून दारुण पराभव करत भारताने सहा सामन्यांची मालिका ५-१ अशी जिंकली. गोलंदाजीत शार्दुल ठाकूरच्या चार बळींनंतर फलंदाजीत कर्णधार कोहलीने ३५वे वनडे शतक लगावताना केलेली नाबाद १२९ धावांची खेळी भारताला विराट विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरली. द. आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले २०५ धावांचे माफक लक्ष्य भारताने ३२.१ षटकांत केवळ २ गडी गमावून काढले. कोहलीने केवळ ९६ चेंडूंचा सामना करताना १९ चौकार व २ षटकारांनी आपली खेळी सजवली.
धोनीचे ६०० झेल

टीम इंंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिमागे ६०० झेल पूर्ण केले. सहाशे किंवा त्याहून जास्त झेल घेणारा तो जगातील केवळ तिसरा यष्टिरक्षक आहे. धोनीच्या नावावर ७७४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६०० झेल व १७४ यष्टिचितांची नांेंद आहे. १४४ कसोटी डावांत २५६ झेल धोनीने घेतले आहेत. २७२ एकदिवसीय सामन्यांत २९२ व ७५ टी-२०मध्ये ४७ झेल धोनीच्या नावावर आहेत. केवळ ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट (८१३ झेल) व दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर (९५२ झेल) महेंद्रसिंग धोनीपेक्षा पुढे आहेत.

कोहलीची विराट कामगिरी
विदेशी भूमीवर एका द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून विराट कोहलीने आपले नाव रेकॉर्डबुकात नोंदविले आहे. विराटच्या नावावर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांत १८६.०० च्या सरासरीने ५५८ धावा केल्या. यापूर्वी रोहित शर्माच्या नावावर हा जागतिक विक्रम होता. रोहितने २०१३-१४ ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ६ सामन्यांत १२२.७५च्या सरासरीने ४९१ धावा केल्या होत्या.

विराटने काल आपले ३५वे एकदिवसीय शतक लगावतानाच या दरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत एबी डीव्हिलियर्सला मागे टाकले. डीव्हिलियर्सच्या नावावर २२८ सामन्यांतून ९५७७ तर कोहलीच्या खात्यात २०८ सामन्यांतून ९५८८ धावा जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत कोहलीने १५व्या स्थानी झेप घेतली. ऍडम गिलख्रिस्ट (९६१९) व मोहम्मद युसूफ (९७२०) हे कोहलीच्या दृष्टिपथात आहेत.