पाकिस्तान संघाचा युनिस फलंदाजी प्रशिक्षक

0
196

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मंगळवारी माजी कर्णधार युनिस खान याची इंग्लंड दौर्‍यासाठी पाकिस्तान संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर मुश्ताक अहमद याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांच्यासह ही दुकली काम करणार आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा दौरा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहे. दोन्ही संघात तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका देखील खेळवली जाणार आहे.

या नियुक्तीबद्दल पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी वसीम खान म्हणाले की, मला खूप आनंद होता आहे की युनिस खानसारखा दिग्गज फलंदाज राष्ट्रीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना अमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे.

ते पुढे म्हणाले, मुश्ताक याला इंग्लंडमधील परिस्थितीची पूर्णपणे माहिती आहे. तो बरीच वर्षे इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळला आहे. त्याने इंग्लंड क्रिकेट संघासोबत बरीच वर्षे काम देखील केले आहेत.
पाकिस्तान क्रिकेटची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल युनिस खानने आनंद व्यक्त केला आहे. पाकिस्तानकडून खेळताना युनिस खानने ११८ कसोटी सामन्यात १००९९ धावा केल्या आहेत. ३१३ ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. माजी फिरकीपटू मुश्ताक अहमद याने पाकिस्तानकडून ५२ कसोटी सामन्यात १८५ गडी बाद केले आहेत. याचसोबत इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या संघात फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याने जबाबदारी सांभाळली आहे.