पाकिस्तान विजयी

0
122

कर्णधार सर्फराज अहमद याच्या ४९ चेंडूंतील नाबाद ८९ धावा व अनुभवी शोएब मलिकने २७ चेंडूंत कुटलेल्या ५३ धावांवर आरुढ होत पाकिस्तानने काल मंगळवारी झालेल्या टी-२० सामन्यात स्कॉटलंडचा ४८ धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद २०४ अशी मजल मारून स्कॉटलंडला ६ बाद १५६ धावांवर रोखले. फकर झमन व अहमद शहजाद यांनी पाकला ३३ धावांची सलामी दिली. तिसर्‍या स्थानावर उतरवलेल्या हुसेन तलत याला केवळ १८ धावा करणे शक्य झाले. धोकादायक ठरत असलेल्या झमन याला वैयक्तिक २१ धावांवर इव्हान्सने तंबूचा रस्ता दाखवला. सर्फराजने यानंतर कप्तानी खेळी करताना मलिकसह चौथ्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी रचली. सुरेख मैदानी फटके खेळतानाच सर्फराजने हवेत फटके खेळण्यातही हात आखडता घेतला नाही. यामुळे पाकला द्विशतकी वेस ओलांडता आली.

स्कॉटलंडकडून ऍलेस्डर इव्हान्स सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने केवळ २३ धावांत ३ बळी घेतले. पदार्पणवीर आमिर हमझा याच्या ४ षटकांत पाकने ५७ धावा कुटल्या. जॉर्ज मुनसे व काईल कोएट्‌झर यांनी स्कॉटलंडला ५.१ षटकांत ५३ धावांची सलामी दिली. यानंतर मात्र त्यांच्या फलंदाजांना आवश्यक धावगती राखण्यात अपयश आले. लेगस्पिनर शादाब खानने ४ षटकांत २५ धावा मोजून २ गडी बाद करत स्कॉटलंडचे कंबरडे मोडले. याच मैदानावर आज दुसरा टी-२० सामना होणार आहे.