पाकिस्तानला धडा शिकवायची हीच योग्य वेळ

0
107

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
दि. २७ जुलैच्या दैनिकात पाकिस्तानबाबत दोन बातम्या वाचनात आल्या. एकः श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलीस शहीद, चार जखमी आणि दुसरी – पाकचा जम्मूतील भारतीय लष्करी ठाण्यावर पुन्हा गोळीबार. पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळ्यास नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, त्याला आता दोन महिने झाले. या दोन महिन्यांत पाकिस्तानने किमान डझनभर वेळा आगळीक करून आपले खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे हे दाखवून दिले आहे.
वास्तविक वर्ष-दीड वर्षांपूर्वी पाकिस्तानचे शिष्टमंडळ गुजरातमध्ये गेले, तेव्हा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिष्टमंडळाशी कोणतीही बोलणी न करता त्यांना परत पाठवले होते. पण ते सारे विसरून त्यांनी पुनश्‍च मैत्रीचा हात दिला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
आज पाकिस्तान भारताबाबत अशा काही आगळीक झालीच नाही, अशा आविर्भावात मूग गिळून गप्प आहे. पण पाकिस्तानचा पूर्वइतिहास काय सांगतो बरे? जास्त दूर नको. एका वर्षापूर्वीचाच इतिहास तपासून पाहू. काय आढळते? आढळते ते असे; ८ जानेवारी २०१३ रोजी हिमालयातील कडाक्याची थंडी, धुके आणि घनदाट जंगल यांचा फायदा उठवत काळा पोशाख घातलेल्या पाक सैनिकांनी लान्सनायक सुधाकर सिंह व लान्सनायक हेमराज सिंह या राजपुताना रायफल्सच्या दोघा जवानांचा शिरच्छेद केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर लष्करी संकेत धुडकावून पाकच्या सैनिकांनी लान्सनायक सुधाकर सिंह व लान्सनायक हेमराज सिंह या दोन्ही मृतदेहांची विटंबना करण्याचे काम केले.
भारत-पाक नियंत्रण रेषेवरील मेंढक क्षेत्राक घुसखोरी करून पाकच्या बलूच रेजिमेंटच्या सैनिकांनी हे कृत्य केले. या नापाक कृत्यामुळे खवळलेल्या भारतीय जवानांनी ‘वरिष्ठांचा आदेश मिळाला तर पाकिस्तानची पूर्ण बलूच रेजिमेंट संपवून टाकू’ असे संतप्त उद्गार काढले. पण पाकिस्तानचे हे कृत्य अत्यंत निषेधार्ह असून हा प्रश्‍न उच्चपदस्थांसमोर मांडू, असे भारतीय लष्करी मोहिमांच्या महासंचालकांनी सांगितल्यामुळे सीमेवरील जवानांनी शांतता पाळली हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारत हा विवेकी, संयमी व सहिष्णू देश आहे त्याचा प्रत्यय यातून येत नाही काय? मुख्य म्हणजे पाकच्या या कृत्यामुळे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संरक्षणमंत्री ए. के. अँथनी व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतानाच ‘आमच्या सहिष्णूतेचा व संयमाचा अंत पाहू नका, युद्धाची खुमखुमी असेल तर आम्ही तयार आहोत’ असा आदेश दिला व पाकिस्तान उघडा पडला. आपण त्या गावचे नाहीच, असा पवित्रा घेऊन अप्रत्यक्षरित्या त्यांनी शरणागती पत्करावी लागली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता पाकिस्तान व भारत ही दोघेही अमेरिकेची मित्रराष्ट्रे असली, तरी अमेरिका नेहमीच पाकिस्तानला झुकते माप देत आलेली आहे. पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी व भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे दोघेही जागतिक शांतीदूत म्हणून गाजले व केनेडी नेहमी भारताच्या मैत्रीस जागले, तरी त्यानंतरचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष- विशेषतः बुश, क्लिंटन व विद्यमान ओबामा बराक यानी भारताशी मित्रत्वाते संबंध ठेवले असले तरी त्यांचे पाकिस्तानकडे झुकते माप राहिलेले आहे.
पाकिस्तान भारत वाटाघाटीमध्ये ‘काश्मीर’ हा प्रमुख घटक आहे, हे आता जगाला कळून चुकले आहे. तिसर्‍या राष्ट्राने मध्यस्थी केल्याशिवाय काश्मीरप्रश्‍न सुटणार नाही, ही पाकिस्तानची प्रमुख भूमिका. ही भूमिका मान्य करण्यास अमेरिका अतिउत्सुक आहे, तर भारत कुणालाही हस्तक्षेप करू देण्यास तयार नाही. याचे कारण उघड आहे. भारत सुरुवातीपासून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे या भूमिकेवर ठाम आहे.
या संदर्भात अमेरिका पाकिस्तानचीच बाजू घेईल. ब्रिटनसुद्धा त्याचीच री ओढेल. रशिया याबाबतीत सुरुवातीपासून भारताच्या बाजूने असल्यामुळे पाकिस्तान रशियाचा हस्तक्षेप मानणार नाही. चीन तर भारताचा एक नंबरचा शत्रू बनला असल्यामुळे चीनचे झुकते माप पाकिस्तानलाच असेल. असा या पार्श्‍वभूमीवर हा तिढा सुटायचा कसा?
दै. नवप्रभाच्या दिनांक २६ जुलैच्या ‘विजय दिवस’ या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, ‘१९९९च्या फेब्रुवारीमध्ये एकीकडे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानशी मैत्रीचे हस्तांदोलन करीत असताना आणि लाहोर घोषणापत्रातून भारत-पाक मैत्रीची ग्वाही जगाला दिली जात असतानास दुसरीकडे स्वतः मुजाहिद्दीन असल्याचे भासवत प्रशिक्षित पाकिस्तानी सैनिकांनी कारगिल, द्रास, मश्कोह आणि बटालिकच्या पहाडांमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे घुसखोरी करून भारतीय ठाणी बळकावली.’ म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यापासून तो आजतागायत पाकिस्तानची घुसखोरी चालूच आहे. यासाठी केंद्राने आता त्यांनी योग्य तो धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. यावर शिक्कामोर्तब करून कार्यवाही सुरू करावी, असे सुचवावेसे वाटते.