पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तराची गरज

0
139
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

चीन अप्रत्यक्षपणे, पडद्यामागून पाकिस्तानला मदत करील; परंतु भारताविरुद्ध थेट कारवाई करणार नाही. त्यामुळे आपण केव्हाही पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कारवाई करू शकतो…

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुळातच पाकिस्तानचे धोरण निश्‍चित आहे. झिया उल हक्, झुल्ङ्गिकार अली भुट्टो यांनी ते स्पष्ट केलेले आहे. ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्.’ त्यामुळे अनेक वर्षांपासून पाकिस्तान भारताविरुद्ध कुरापती काढत आहे. पाकिस्तानची एकंदरीत नीती पाहता एका बाजूला कठोर प्रत्युत्तर देतानाच कोणत्याही क्षणी युद्धासाठी आपण तयार असणे आवश्यक आहे.

सुंजावनमध्ये झालेला दहशतवादी हल्ला किंवा सीमापार होणारा गोळीबार, काश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटना हे सर्व पाकिस्तानच्या पद्धतशीर रणनीतीचा भाग आहे. भारताशी उघड किंवा प्रत्यक्ष युद्ध करू शकत नाही, तसेच प्रत्यक्ष युद्धात भारताविरुद्ध आपण जिंकू शकत नाही, याची खात्री पटल्यामुळे पाकिस्तानने प्रॉक्सी वॉर किंवा छुप्या युद्धाचा मार्ग अवलंबला आहे. १९९९ च्या कारगिल युद्धानंतर पारंपरिक युद्धात भारताला आपण पराभूत करू शकत नाही, हे पाकिस्तानच्या नव्याने लक्षात आले. त्यानंतर दहशतवादी घटनांमधे प्रचंड वृद्धी होऊन सुसूत्रता आली. मुंबईवरील २००८ चा जिहादी हल्ला या युद्धाचा उच्चतम बिंदू होता. २०१६ चा पठाणकोट एअरबेसवरील जिहादी हल्ला आणि त्यानंतर काश्मीर खोर्‍यात सुरू झालेला हिंसाचार, अनागोंदी या युद्धाच्या नवीनतम प्रणालीची दुदुंभी ठरली.

पाकिस्तानच्या ‘नॉन स्टेट ऍक्टर्स’नी चालवलेल्या या युद्धात ङ्गाळणीनंतरच्या पाचव्या पिढीचा सहभाग आहे. पाकिस्तान शांतता वार्तालाप चालू ठेवत आधी समेटाचे एक पाऊल पुढे टाकतो. त्यामुळे भारताच्या आशा पल्लवीत होतात आणि त्यानंतर लगेचच पाकिस्तानकडून जिहादी हल्ला होतो. यावर अशा हल्ल्यांमध्ये आमचा हात नाही, असा खोटारडेपणाही पाकिस्तानकडून दाखवला जातो. वर्षानुवर्षे पाकिस्तानचा हा नाट्यमय प्रयोग सुरू राहिला आहे आणि आजवरच्या राजकीय नेतृत्त्वाने नेहमीच संयमाची भूमिका घेतली आहे. पाकिस्तान भारताच्या या संयमाला कमजोरपणा समजू लागला होता. त्यामुळेच दिवसेंदिवस पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवाया वाढतच चालल्या होत्या. उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय सैन्याचे १८ जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला. मात्र, तरीही सीमेवरून होणारी घुसखोरी, शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या. त्यामुळेच पाकिस्तानला एक सणसणीत तडाखा देण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली होती. अखेर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आणि दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. हा निर्णय स्वागतार्ह होता आणि ही कारवाईही गरजेचीच होती. मात्र, त्यामुळे साधले काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

याचे कारण सर्जिकल स्ट्राईकनंतरच्या गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानकडून होणार्‍या घुसखोरीत आणि युद्धविरामाचे उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानने २००२ ते २०१६ या १४ वर्षांच्या काळात जवळपास ११ हजार २७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या काळात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर झालेल्या गोळीबारामध्ये सुमारे ३१३ भारतीय नागरिकांचा बळी गेला आहे. साऊथ एशियन टेररिझम पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये २०१६ मध्ये सुमारे ६४ जवान शहीद झाले आहेत. यापूर्वी २०१० मध्ये भारताचे ६९ जवान हुतात्मा झाले होते. याच पोर्टलच्या माहितीनुसार, १९९७ ते २००७ या काळामध्ये पाकिस्तानकडून होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे दरवर्षी सुमारे ८०० भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सीमेवरून होणार्‍या घुसखोरीच्या घटनांमध्ये घट झाली होती. मात्र, २०१६ मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने घुसखोरीच्या घटनांमध्ये अचानकपणाने वाढ झाली. तसेच त्यामुळे भारतीय सैनिकांचे शहीद होण्याचे प्रमाणही वाढले. तसेच सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेपलीकडून होणारा उखळी तोङ्गांचा मारा आणि गोळीबार वाढला आहे. तसेच घुसखोरीचे प्रयत्नही वाढले आहेत.

पाकिस्तानी लष्करामध्ये जवळपास ८० ते ८५ टक्के पंजाबी मुसलमान आहेत. मुजाहिर, सिंधी व इतरांची संख्या १५ ते २० टक्के आहे. आपल्याकडील शीखांप्रमाणेच पाकिस्तानातील पंजाबी मुसलमानही काहीसे आक्रमक असतात. त्यामुळे वाटेल तेव्हा ते खोड्या काढत असतात. यावेळी या खोड्या वाढल्या आहेत. आपणही त्याला चोख प्रत्युत्तर देत आहोत. मात्र यामध्ये आपले जवान शहीद होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारताने आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अधिक जोरदार हल्ला करण्याची गरज आहे. असे केल्यास तेथे असलेले चीनचे सैन्य भारताविरुद्ध पाकिस्तानला साथ देतील का, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो; परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, चीन हा व्यापारी देश आहे. भारत आणि चीन यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी संबंध मोठे आहेत. भारतामध्ये चीनचे जवळपास २०० अब्ज डॉलर्स गुंतलेले आहेत. हे लक्षात घेता चीन अप्रत्यक्षपणे, पडद्यामागून पाकिस्तानला मदत करील; परंतु भारताविरुद्ध थेट कारवाई करणार नाही. त्यामुळे आपण केव्हाही पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कारवाई करू शकतो. मात्र, बलुचिस्तानमध्ये भारताने काही कारवाई केल्यास चीनकडून त्याला विरोध होऊ शकतो, कारण त्या भागात चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉर या चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने कारवाई केल्यास चीन त्याला विरोध करणार नाही. त्यामुळे भारताने आता याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला युद्धखोर शेजारी लाभला आहे. १९४७ पासून पाकिस्तान हिंदुस्थानावर कब्जा मिळवण्यासाठी सतत काही ना काही प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासूनच ते काश्मीरवर दावा सांगत आहे. भारताशी सौहार्दाचे संबंध पाकिस्तानातील लष्कराला मुळातच नको आहेत. कारण तसे संबंध प्रस्थापित झाल्यास पाकिस्तानी लष्कराचे आर्थिक साम्राज्य नष्ट होणार आहे. भारतामध्ये ज्याप्रमाणे शस्रास्रांसाठी, दारुगोळ्यासाठी अथवा मोहिमांसाठी राजकीय नेतृत्त्वाची परवानगी आवश्यक असते. तसा प्रकार पाकिस्तानमध्ये नाही. तेथे लष्कर हे राजकीय नेतृत्त्वापेक्षा वरचढ आहे आणि त्यांना हे वर्चस्व टिकवायचे आहे. यासाठी ते भारतातील, काश्मीर खोर्‍यातील अशांततेचा सातत्याने ङ्गायदा घेत आले आहेत आणि घेत राहतील. आता गरज आहे ती सडेतोड प्रत्युत्तराची. देशाला त्याचीच आज प्रतीक्षा आहे.