पाकिस्तानचा फैसला

0
159

आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तान आज सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जात आहे. त्या निवडणुकीशी आपले काय देणेघेणे असे जर कोणी म्हणत असेल तर ते पोरकटपणाचे ठरेल, कारण शेवटी आपला हा शेजारी देश आहे आणि तेथे स्थिर, लोकशाहीवादी राजवट सत्तेवर राहणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे. दुर्दैवाने पाकिस्तानची सत्ता वेळोवेळी लष्करशहांच्याच हाती जात राहिली आहे. अगदी पाकिस्तान निर्मितीपासून जनरल अयुब खान, याह्या खान, झिया उल हक, परवेझ मुशर्रफ अशा लष्करशहांनी वेळोवेळी तेथील सरकारे उलथवून टाकून सत्ता आपल्या हाती घेतली. यावेळी असे काही घडले नाही. मागील सरकारने आपला कार्यकाळ भले पूर्ण केला, परंतु तरीही आज होणार्‍या निवडणुकीवर विद्यमान लष्करशहांनी अप्रत्यक्षपणे का होईना आपले पाश आवळलेले दिसत आहेत. यावेळी पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचा नेता माजी क्रिकेटपटू इम्रान खान याच्या मागे उभी असल्याचे दिसून येते आहे. इम्रानचा पाकिस्तानच्या राजकीय क्षितिजावर झालेला उदय आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांमागे सध्या लागलेले शुक्लकाष्ठ या दोन्ही गोष्टी निव्वळ योगायोगाने घडलेल्या नाहीत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कन्येला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनुक्रमे दहा आणि सात वर्षांच्या कारावासात ढकलण्यात आले आहे. त्यांच्या मागून त्यांच्या पक्षाची धुरा वाहणार्‍या शहबाज शरीफला शह देण्यासाठी पक्षाच्या अनेक बड्या उमेदवारांवर दबाव आणून त्यांना पक्षांतरे करण्यास किंवा अपक्ष उभे राहण्यास भाग पाडण्यात आलेले आहे. यापैकी अनेकांवर हल्ले झाले, त्यांच्या व्यवसायांवर हल्ले झाले, काहींवर अपात्रतेची तलवार टाकली गेली आणि दबावाने पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पासून फारकत घेण्यास भाग पाडले गेले आहे. माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी यांचा पुत्र बिलावल याच्या नेतृत्वाखाली त्यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला असला तरी त्यावरही दहशतवादाची टांगती तलवार आहे. या सार्‍या परिस्थितीत इम्रानच्या पाकिस्तान तेहरिक ई इन्साफला म्हणजे पीटीआयला मोकळे रान करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न तेथील लष्करी राजवटीने चालवलेला आहे. कडव्या उजव्या शक्तींही इम्रानच्या पाठीशी उभ्या राहताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या निवडणुकीत सगळ्या कडव्या धार्मिक पक्षांची मुत्तहिद मजलीस ई अमल ही मोट बांधून उतरलेला कुख्यात दहशतवादी फजलूर रेहमान खलीलही निवडणुकीच्या तोंडावर इम्रानला पाठिंबा दर्शवून मोकळा झाला आहे. या सर्वाचा अर्थ स्पष्ट आहे. पाकिस्तानची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर तो देश पंजाब, सिंध, खैबर पख्तुन आणि बलुचिस्तान या चार प्रांतांमध्ये वाटला गेला आहे. त्याशिवाय ‘फाटा’ प्रांत आणि राजधानी इस्लामाबाद यांचेही स्वतंत्र स्थान आहे. एकेका पक्षाचे हे बालेकिल्ले राहिले आहेत. नवाज शरीफ हे पंजाबचे असल्याने त्यांच्या पक्षाचे आजवर तेथे प्राबल्य राहिले. पीएमएल (एन) चा आजवर तेथे वरचष्मा असे, परंतु आताच्या फाटाफुटीमुळे पक्षापुढे आव्हान उभे राहिले आहे. सिंध प्रांत हा भुत्तो – झरदारींच्या पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे बलस्थान. तेथेही बिलावल यांच्यापुढे पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. खैबर पख्तूनमध्ये इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक ई इन्साफचा प्रभाव वाढला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीची रचना आपल्यासारखी नाही. तिच्या ३४२ जागांपैकी साठ जागा महिलांसाठी आणि दहा अल्पसंख्यकांसाठी राखीव असतात आणि उर्वरित २७२ जागांवर विजय मिळवणार्‍या पक्षांना त्यांच्या जागांच्या प्रमाणात तेथे संधी मिळते. म्हणजे २७२ जागांवरच निवडणूक होणार आहे आणि त्याच बरोबर प्रांतिक असेंब्लींच्याही निवडणुका होत आहेत. अटीतटीची लढत पीटीआय, पीएमएल (एन) आणि पीपीपी यामध्येच आहे. पाकिस्तानमध्ये कोणीही सत्तेवर आले तरी भारतविरोधी नीती राबवणे हे त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी आवश्यकच असते. तरीही इम्रान खानच्या पीटीआयला कडव्या इस्लामी शक्तींचेही असलेले पाठबळ आणि स्वतः त्याने ईश्वरनिंदाविरोधी कायद्याची केलेली भलावण वगैरे पाहता इम्रान कडव्या धार्मिक भावनांवर स्वार होऊन पंतप्रधानपद पदरात पाडून घेऊ पाहतो आहे. या निवडणुकीनंतर होणारे एका लोकनियुक्त सरकारकडून दुसर्‍या लोकनियुक्त सरकारकडे होणारे सत्तांतर हे पाकिस्तानच्या आजवरच्या इतिहासातील केवळ अशा प्रकारचे दुसरे सत्तांतर आहे यावरून तेथील लोकशाहीपुढील लष्करशाहीचे आव्हान लक्षात येते. नवाज शरीफ यांच्याविषयीची त्यांच्या पंजाबमधील सहानुभूतीची लाट इम्रानची सत्तेची वाट रोखते का, तरुण बिलावलला त्याच्या राजकीय वारशाचा फायदा मिळतो का हे ही निवडणूक सांगणार आहे. इम्रानसारख्या कडव्या व्यक्तीकडे जर पाकिस्तानची सूत्रे खरोखरच गेली तर ते भारतासाठी नक्कीच धोक्याचे असेल.