पाकच्या फलंदाजांचा दर्जा घसरलेला ः मियॉंदाद

0
102

सध्या पाकिस्तान संघाकडून खेळणारा एकही फलंदाज ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड किंवा भारतीय संघात स्थान मिळविण्याच्या दर्जाचा नसल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू जावेद मियॉंदाद यांनी काल बुधवारी केले. पाकिस्तानी संघात गोलंदाज आहेत. परंतु, फलंदाजांचा दर्जा घसरला आहे.
सध्याचे क्रिकेट हे रोजंदारीवर चालते. आजच्या कामगिरीचे पैसे आजच दिले जातात. प्रदर्शन खालावले तर दुसरा खेळाडू तुमची जागा घेण्यासाठी तयार असतो. पाकिस्तान संघाचे मात्र वेगळेच असते. खेळाडू संघातील जागा गृहित धरतात. त्यांना हक्काने संघात जागा हवी असते, त्यामुळे पाकिस्तानी संघ फलंदाजीत ढासळला आहे.

माजी सलामीवीर अहमद शहजाद याने अजून १२ वर्षे खेळण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावर बोलताना मियॉंदाद म्हणाले की, तुम्ही जोपर्यंत धावा करत आहात तोपर्यंत तुमच्या जागेला धोका नसतो. तुम्ही १२ कशाला २० वर्षे खेळा, यावर कोणाचाही आक्षेप नसतो. परंतु, पूर्वपूण्याईच्या जोरावर संघात जागा मागण्याचे सोडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारखे देश प्रत्येक मालिकेतील कामगिरीनुसार खेळाडूंची निवड करतात. पाकिस्तानात मात्र एक शतक लगावून पुढील दहा डावांत दुहेरी धावसंख्या करण्यात अपयश आलेल्या खेळाडूलासुद्धा स्थान मिळते. त्यामुळे पाकने संघ निवडताना आपल्या धोरणात बदल करणे आवश्यक असल्याचे मियॉंदाद म्हणाले. मियॉंदाद यांनी पाकिस्तानकडून १२४ कसोटींत ८८३२ धावा व २३३ वनडेत ७३८१ धावा केल्या आहेत.