पहिल्या डावात भारताच्या २९७ धावा

0
109

>> रवींद्र जडेजाचे झुंजार अर्धशतक

अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी यांनी पाचव्या गड्यासाठी केलेल्या ८३ धावांच्या भागीदारीनंतर रवींद्र जडेजा व इशांत शर्मा यांनी आठव्या गड्यासाठी जोडलेल्या ६० धावांच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद २९७ धावा केल्या आहेत.

पहिल्या दिवशी भारताने चहापानापर्यंत ४ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारली होती. रहाणे ४९ व विहारी १८ धावांवर खेळत होते. शेवटच्या सत्रात रोचने हनुमा विहारीला सर्वप्रथम बाद केले. रोचला बचावात्मक फटका खेळण्याच्या नादात यष्टिरक्षक होपकडे झेल देऊन त्याने तंबूची वाट धरली. विहारीनंतर रहाणेदेखील फार काळ टिकला नाही. गेब्रियलच्या चेंडूचा अंदाज न आल्याने चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्ट्यांवर आदळला. त्याचे शतक १९ धावांनी हुकले. पहिल्या दिवसअखेर भारताने ६८.५ षटकांत ६ बाद २०३ पर्यंत मजल मारली. पंत २० व जडेजा ३ धावा करून नाबाद राहिले.

कालच्या धावसंख्येवरून पुढे खेळताना पंतला मोठी खेळी करता आली नाही. वैयक्तिक २४ धावांवर त्याने तंबूची वाट धरली. जडेजा मात्र जिद्दीने खेळला. ईशांत शर्माला सोबतीला घेत त्याने विंडीज गोलंदाजांना तडाखा दिला. ईशांतने ६२ चेंडूंचा सामना करताना एक चौकारही लगावला. मोहम्मद शमी पहिल्याच चेंडूवर पतला. जडेजाने यानंतर बुमराहला हाताशी धरून आपले ११वे कसोटी अर्धशतक ठोकतानाच कसोटीत दीड हजार धावांचा टप्पा ओलांडला.

धावफलक
भारत पहिला डाव (४ बाद १३४ वरून) ः अजिंक्य रहाणे त्रि. गो. गेब्रियल ८१, हनुमा विहारी झे. होप गो. रोच ३२, ऋषभ पंत झे. होल्डर गो. रोच २४, रवींद्र जडेजा झे. होप गो. होल्डर ५८, ईशांत शर्मा त्रि. गो. गेब्रियल १९, मोहम्मद शमी झे. व गो. चेज ०, जसप्रीत बुमराह नाबाद ४, अवांतर १९, एकूण ९६.४ षटकांत सर्वबाद २९७
गोलंदाजी ः किमार रोच २५-६-६६-४, शेन्नन गेब्रियल २२-५-७१-३, जेसन होल्डर २०.४-१-११-३६-१, मिगेल कमिन्स १३-१-४९-०, रॉस्टन चेज १६-३-५८-२

विंडीज २ बाद ५०
अंतिम वृत्त हाती येईपर्यंत वेस्ट इंडीजने २० षटकांत २ गडी गमावून ५० धावा केल्या होत्या. पदार्पणवीर शामराह ब्रूक्स ११ धावांवर नाबाद होता तर डॅरेन ब्राव्हो याने अजून खाते खोलले नव्हते. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट १४ व जॉन कॅम्पबेल २३ धावा करून बाद झाले. मोहम्मद शमीने कॅम्पबेलचा त्रिफळा उडविला तर ईशांतने स्वतःच्या गोलंदाजीवर ब्रेथवेटचा झेल घेतला. कॅम्पबेलने सुरुवातीलाच ईशांतच्या गोलंदाजीवर प्रहार करत त्याची लय बिघडवून टाकली होती. त्यामुळे कोहलीला गोलंदाजीत बदल करावा लागला. शमीने आपल्या पहिल्याच षटकात त्याचा काटा काढला.