पहिला ठोसा!

0
91

जो यथा वर्तते यस्मिन् तस्मिन एवं प्रवर्तयन् |
नाधर्मं समवाप्नोति न चाश्रेयश्च विदन्ति ॥
‘जो आपल्याशी जसा वागतो, त्याच्याशी तसेच वागल्याने अधर्म केला असे होत नाही!’ असे महाभारताच्या उद्योगपर्वामध्ये भीष्म पितामह परशुरामाला सांगतात. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सेनेने काल रात्री दहशतवाद्यांच्या अड्‌ड्यांवर जो हल्ला चढविला त्याबाबतही असेच म्हणावे लागेल. पाकिस्तान आजवर दहशतवाद्यांना राजाश्रय देत आला. पूर्वी हे समर्थन गुप्ततेच्या आवरणाखालून असे, पण अलीकडे दहशतवादाचे अगदी उघडउघड समर्थन पाकिस्तानने चालवले होते. नवाज शरीफ यांची संयुक्त राष्ट्र आमसभेपुढील उर्मट भाषा हेच दर्शवीत होती. त्यामुळे ज्यांनी उरीच्या आपल्या लष्करी ठाण्यावर हल्ला चढवून जणू भारताच्या उरावरच घाव घातला, ज्यांनी पठाणकोट घडवले, गुरुदासपूर घडवले, मुंबईमध्ये मृत्यूचे थैमान मांडले, त्याहीपूर्वी संसदेवर हल्ला चढवण्यापर्यंत ज्यांची मजल गेली, ज्यांनी कंदाहार घडवले… ज्यांच्या छोट्या मोठ्या हल्ल्यांची आणि बॉम्बस्फोट मालिकांची तर गणतीच नाही अशा पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या टोळक्यांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना एक जबरदस्त संदेश भारताने सीमेपार जाऊन केलेल्या या कारवाईने दिलेला आहे. आजवर जे झाले ते झाले. यापुढे भारताकडे वाकडी नजर करून पाहाल तर मुळापासून उखडू असा हा खणखणीत संदेश आहे. उरी हल्ल्यानंतर जो आक्रोश देशभरामध्ये व्यक्त होत होता, तो जणू आपल्या जवानांच्या बंदुकांतल्या गोळ्यांमधून काल कडाडला आहे. किती सोसायचे यालाही काही मर्यादा असतेच. त्यामुळे परिणामांची पर्वा न करता किंबहुना खरे तर परिणामांना सामोरे जाण्याची पूर्ण तयारी ठेवून भारताने पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्याचे नाक कापले आहे. ‘तोवरि जंबूक करी गर्जना, जोवरी न देखे पंचानना’ म्हणतात तद्वत् पाकिस्तानच्या कोल्हेकुईला भारताने या एका जोरदार गर्जनेने उत्तर दिले आहे. कानठळ्याच बसवल्या आहेत. ‘कोठे आणि कसे उत्तर द्यायचे ती वेळ आणि स्थळ आम्ही ठरवू’ म्हणणार्‍या भारतीय लष्कराने आपले शब्द खरे करून दाखवले आहेत. ‘खलानां कण्टकानांच द्विविधैव प्रतिक्रिया | उपानामुखभंगे वा दूरतैव विसर्जनम् ॥ असे चाणक्य नीती सांगते. म्हणजे दुष्टाचा आणि काट्याचा दोनच प्रकारे सामना करायचा असतो. एक तर त्याला पादत्राणाने ठेचून काढायचे किंवा दूर अंतरावरून टाळायचे. भारताने आजवर पाकिस्तानशी मैत्री करण्याचा, समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी हा साप उलटलाच. त्यामुळे कुठवर हे घाव आपण सहन करीत राहणार आहोत हा सवाल संतप्त देश आज विचारत होता. त्यामुळे अशा प्रकारचे दणका देणारे पाऊल त्याचे सर्व धोके विचारात घेऊनही उचलले जावे अशी राष्ट्रभावना होती. विविध राजकीय पक्ष आणि मुलायमसिंहांपासून केजरीवालांपर्यंतचे नेते आज सरकारच्या या निर्णयाच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत, कारण क्षुद्र राजकारणापोटी या राष्ट्रभावनेचा अनादर करण्याची आणि तिच्या विरोधात जाण्याची कोणाची प्राज्ञा नाही! मुळात हा राजकारण करण्याचा विषयच नाही. त्यामुळे या कारवाईबाबत कोणी प्रौढी मिरवू नये आणि कोणी तिला नावेही ठेवू नयेत! सैन्यदलांना प्रत्युत्तराची पूर्ण मोकळीक मिळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही हा कसोटीचा क्षण होता. अटलबिहारी वाजपेयींनी अणुस्फोटांना परवानगी देऊन ज्या निधडेपणाचे दर्शन घडवले, त्याच तोडीचा त्यांचा हा निर्णय आहे आणि तो प्रत्यक्षात उतरवण्यात एका गोमंतकीय संरक्षणमंत्र्याचे योगदान आहे ही आपल्यासाठीही अभिमानाची बाब आहे. भारतीय सेनेने नियंत्रण रेषेपार जाऊन केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे किती नुकसान झाले, किती तळ उद्ध्वस्त झाले याबाबत कदाचित सवाल उपस्थित केले जातील, परंतु प्रत्यक्ष नुकसानापेक्षाही जे धाडसी पाऊल उचलले गेले, त्याचा भावनिक परिणाम फार मोठा होणार आहे. ही कारवाई केवळ प्रातिनिधिक आहे. दहशतवाद्यांची वळवळ यापुढे सहन केली जाणार नाही आणि गरज भासली तर अमेरिकेने जसे ओसामा बिन लादेनला हुडकून काढून खात्मा केला, तसे हाफिज सईदपासून झाकीउर रेहमान लखवी आणि सय्यद सलाउद्दिनपर्यंत जे जे वळवळते साप पाकिस्तानच्या पदराखालून भारताविरुद्ध सतत विष ओकत आलेले आहेत, त्यांना थेट पाकिस्तानी हद्दीत घुसून संपविण्याचा धोका पत्करायलाही यापुढे भारत तयार असेल हा खणखणीत संदेश या कारवाईतून गेला आहे. हा हल्ला पाकिस्तानसाठी एवढा अनपेक्षित होता की, त्याला काय प्रत्युत्तर द्यावे हेही नवाज शरिफांना सुचले नाही. अशा प्रकारचे हल्ले झालेच नसल्याचा आव पाकिस्तानने आणला, कारण हल्ले झाले हे मान्य करावे तर त्याचा अर्थ नियंत्रण रेषेपाशी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सज्ज होते याची ती कबुली ठरते! पण खरोखर हल्ले झाले याची साक्ष काल सकाळीच सीमेवर पाकिस्तानकडून सुरू झालेल्या गोळीबारानेच दिली आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज देश आहे आणि तो कोणत्याही पातळीला जाऊ शकतो हे जरी खरे असले, तरी आज जागतिक वातावरण पाकिस्तानला अनुकूल नाही. महासत्तांनी त्याच्यापासून अंतर राखले आहे. सार्क परिषदेवर भारताने बहिष्कार जाहीर केला तेव्हा पाठोपाठ बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान यांनी त्यातून अंग काढून घेतले. श्रीलंका आणि नेपाळनेही पाकिस्तानबाबत नापसंती दर्शवली. पाकिस्तान जागतिक राजकारणात असा एकाकी पडत चालला आहे. त्यामुळे घाव घालण्याची ही सर्वांत योग्य वेळ होती. अर्थात, या संघर्षाचे युद्धात रुपांतर होऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे भारतानेही पक्क्या खबरेच्या आधारे झालेले दहशतवाद्यांवरील हे हल्ले संपुष्टात आले असून ही कारवाई पुढे सुरू राहणार नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तानने त्यामुळे खरे तर प्रत्युत्तरासाठी फुरफुरण्याची आवश्यकता नाही. परंतु जर यदाकदाचित तसा प्रयत्न झालाच, तर तुकोबांच्या शब्दांत ‘मदे मातले, नागवे नाचे | अनुचित वाचे बडबडी’ अशी स्थिती झालेल्या पाकिस्तानला अत्यंत खमके उत्तर देण्यासही आपली सैन्यदले समर्थ आहेत. सव्वाशे कोटींचा हा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि तसा तो राहिला पाहिजे.