पश्‍चिम बंगालमध्ये प्रचाराचा कालावधी घटवला

0
135

>> निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निर्णय

>> कलम ३२४चा देशात प्रथमच वापर

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील ९ मतदारसंघांमधील निवडणूक प्रचाराचा कालावधी २० तासांनी घटवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून येथील प्रचार थांबवण्याचे आदेश आयोगाने जारी केले आहेत. निवडणूक आयोगाने प्रथमच कलम ३२४ अंतर्गत आपल्या अधिकारात हा निर्णय घेतला आहे. येत्या १९ तारखेला याठिकाणी मतदान होत आहे.

पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकातात मंगळवारी रोड शोवेळी झालेल्या हिंसाचारात पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याने निवडणूक आयोगाला अतीव दु:ख झाले आहे. हे कृत्य करणार्‍या दोषींना लवकरच पकडले जाईल, अशी अपेक्षा आम्ही करतो. निवडणूक आयोग कदाचित पहिल्यांदाच कलम ३२४ चा अशाप्रकारे वापर करत असेल. मात्र, शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यामध्ये हिंसाचार किंवा कायद्याच्या उल्लंघनासारखे प्रकार घडल्यास याचा पुन्हा वापर होऊ शकतो, असे निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याशिवाय, निवडणूक आयोगाने रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यास बंदी केली आहे. गेल्या २४ तासांतील घटना, निवडणूक अधिकार्‍यांकडून मिळालेला अहवाल या सगळ्या बाबी लक्षात घेऊन भयमुक्त वातावरणात सातव्या टप्प्यातील मतदान पार पाडावे म्हणूनच पश्‍चिम बंगालमध्ये प्रचाराची वेळ घटवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दोन अधिकार्‍यांवरही कारवाई
निवडणूक आयोगाने कारवाईचा दणका देत पश्‍चिम बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव कुमार आणि गृह विभागाचे मुख्य सचिव अत्री भट्टाचार्य यांना पदावरून हटवले आहे. मुख्य सचिवांकडे या खात्याचा पदभार सोपवण्यात येणार आहे.

कालच्या हिंसाचारानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली होती. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग निःपक्षपातीपणे वागत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. तसेच तृणमूल कॉंग्रेसने केलेल्या हिंसाचाराविरोधात निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणीदेखील अमित शहा यांनी केली होती.

काय आहे कलम ३२४?
हे कलम निवडणूक आयोगासाठी मोठे आयुध मानले जाते. निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात म्हणून स्वत:च्या अधिकारात आयोगाला निर्णय घेण्याची मुभा या कलमाने दिली आहे. याअंतर्गत प्रशासनातील तैनात अधिकारी, प्रचार कालावधी निश्चिती आणि प्रचाराचे नियम यावर स्थितीनुसार निर्णय घेतला जाऊ शकतो. आयोगाच्या म्हणण्यानुसार हे कलम प्रथमच लागू करण्यात आले असून प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाल्यास आणखी कठोर पावले उचलण्याचे संकेतही आयोगाने दिले आहेत.

भाजपच्या सांगण्यावरून निर्णय
ममता बॅनर्जी यांचा आरोप

निवडणूक आयोगाने भाजपच्या सांगण्यावरूनच पश्चिम बंगालमधील प्रचाराचा कालावधी कमी केला, असा आरोप तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय अयोग्य, अनैतिक आणि राजकीयदृष्ट्या पक्षपाती आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी होणार्‍या दोन सभा घेण्यासाठी वेळ देऊ केला आहे. यानंतर निवडणूक आयोगाने प्रचार थांबवण्याचे आदेश दिल्याचे ममता यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कालच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनाही लक्ष्य केले. अमित शहा यांनी बाहेरून गुंड आणून कोलकात्यामध्ये हिंसाचार घडवला. हा हिंसाचार बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या हिंसाचाराइतकाच भीषण होता. या हिंसाचारावेळी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीचीही तोडफोड करण्यात आली. मात्र, नरेंद्र मोदींना त्याबद्दल काहीही वाटत नाही. बंगालच्या जनतेने ही गोष्ट गंभीरपणे घेतली आहे. आम्ही अमित शहा यांच्याविरुद्ध जरूर कारवाई करू असे त्या म्हणाल्या.