पवारांचे पंतप्रधानपदः इजा, बिजा, तिजा!

0
183
  • ल. त्र्यं. जोशी  (नागपूर )

पंतप्रधानपद त्यांना हुलकावणीच देत आले आहे, पण म्हणून त्यांनी त्या पदाची आकांक्षा सोडली आहे असे म्हणता येणार नाही. जाहीरपणे ते काहीही म्हणत असले तरीही. कारण त्यांना हे पक्के ठाऊक आहे की, नियती ते पद कुणाला, केव्हा देईल याचा अजिबात भरवसा नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांचा मी भारताचे ‘निसटते’ पंतप्रधान असा उल्लेख करतो, तो उगीच नाही. कारण जेव्हा जेव्हा पंतप्रधानपदाची चर्चा होते, तेव्हा तेव्हा त्यांचे नाव त्या पदासाठी अपरिहार्यपणे चर्चिले जाते. आज देश २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभा असतानाही तेच घडत आहे. ‘मला पंतप्रधान व्हायचे आहे’ असे पवारसाहेब कधीच म्हणत नाहीत, उलट ‘माझ्याजवळ अतिशय अल्प खासदार असल्याने मी त्या पदाचा विचारच करू शकत नाही’ असे म्हणून आपले पाय जमिनीवर असल्याचेच ते सूचित करतात. पंतप्रधानपद सांभाळण्याच्या त्यांच्या क्षमतेबाबत मात्र त्यांच्याच काय, कुणाच्याही मनात शंका नाही. तेवढा त्यांचा वकूब निश्चितच आहे. सर्व पक्षांत त्यांचे मित्र आहेत. देशातील बहुतेक उद्योगपतींशीही त्यांचे सख्य आहे. मनात आणले तर ते शंभर कोटी रुपये काही तासांत उभे करु शकतात, एवढे त्यांच्या शब्दाला वजन आहे, ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही. प्रशासकीय क्षमता निर्विवाद आहे.

सार्वजनिक जीवनाचा दांडगा अनुभव आहे. तरीही पंतप्रधानपद त्यांना हुलकावणीच देत आले आहे, पण म्हणून त्यांनी त्या पदाची आकांक्षा सोडली आहे असे म्हणता येणार नाही. जाहीरपणे ते काहीही म्हणत असले तरीही. कारण त्यांना हे पक्के ठाऊक आहे की, नियती ते पद कुणाला, केव्हा देईल याचा अजिबात भरवसा नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात याची सहा वर्षांपूर्वी कुणी कल्पना केली होती? राजीव गांधी यांची हत्या होईल व नरसिंहराव पंतप्रधान होतील हे तरी कुणाला आधी ठाऊक होते?उण्यापुर्‍या पन्नासेक खासदारांच्या बळावर चरणसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा वा गुजराल पंतप्रधान होऊ शकतात याची तरी कुणाला पूर्व जाणीव होती? राजकारणात शेवटी संधी महत्वाची असते, पण तिचे सोने करणे मात्र नियतीच्याच हातात असते. अन्यथा यापूर्वी दोनदा त्या पदाच्या पायरीपर्यंत पोचूनही शरद पवारांना ते पद मिळू शकले नाही, या वास्तवाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?.
शरदरावांनी लोकसभेची पहिली निवडणूक लढविली तेव्हा आपण ती खासदारकीसाठी लढलो नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. जोपर्यंत नेहरु गांधी घराण्यातील उमेदवार उपलब्ध राहील, तोपर्यंत आपल्याला ते पद मिळणार नाही हे अतिशय व्यवहारचतुर असलेल्या त्यांना कळत नव्हते असेही नाही. पण ते पद मिळवण्याची सुप्त आकांक्षा मात्र त्यांनी कधीही सोडली नाही. आजही नाही. त्यामुळेच राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी त्या आकांक्षेचा कौल घेण्याचा प्रयत्न अधिकृतपणे केला. त्यावेळी म्हणजे १९९१ साली झालेल्या कॉंग्रेस सांसदीय पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक त्यांनी लढविली, पण त्या निवडणुकीचा कौल नरसिंहरावांना मिळाला आणि त्यांना संरक्षणमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. पुढे नरसिंहरावांना संधी मिळताच त्यांनी पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी पाठविले. देशाच्या संरक्षणमंत्र्याने राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा तो पहिला प्रसंग. त्यानंतर अर्थातच मनोहर पर्रीकरांचा नंबर लागतो.

पुढे राजकारणाची मिजास बदलत गेली. कॉंग्रेसप्रधान राजकारणाचे स्वरुप बदलले. ते भाजपाप्रधान बनण्याची प्रक्रिया १९९६ मध्ये सुरु झाली. त्यामुळे पवारांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरच समाधान मानावे लागले. असे असतानाच दुसरी संधी त्यांच्याकडे चालून आली. त्यावेळचे कॉंग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी सकृतदर्शनी क्षुल्लक वाटणार्‍या मुद्यावरुन गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घेतला. वस्तुत: विरोधकांमधील सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेसला सरकार बनविण्याचा दावा करता आला असता व लोकसभेत बहुमत सिध्द करण्याची संधी तरी मिळाली असती किंवा किमान सहा महिने तरी सरकार चालविण्याची संधी मिळाली असती, कारण तशी संंधी एकदा चरणसिंग यांना मिळाली होती व स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन भाषण ठोकून त्यांनी तिचे ‘सोने’ही करुन घेतले होते, पण नेमक्या या वेळी केसरी यांनी घाण केली. गुजराल सरकार पडल्यानंतर राष्ट्रपतींना भेटून कॉंग्रेस पक्षाला सरकार बनविण्यात रस नाही असे त्यांनी सांगून टाकले. नेमक्या या वेळी सहा महिन्यांसाठी का होईना, पण पवारांची पंतप्रधान बनण्याची दुसरी संधी हुकली, कारण सीताराम केसरींनी चोंबडेपणा केला नसता तर त्यावेळचे विरोधी पक्षनेते शरद पवार यांना सरकार बनविण्याची संधी देणे भाग होते. त्या सरकारला बहुमत सिध्द करता आले असते की नाही हा प्रश्न वेगळा, पण शरद पवार यांची भारताचे पंतप्रधान म्हणून इतिहासात नोंद झाली असती.
आता त्यांना पुन्हा एकदा ती संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तिचे ते सोने कसे करतात हे पुढच्या लेखात पाहू.

पवार चुकीचे बोलतायत?
इतर कोणत्याही राजकारण्याइतके शरद पवारही जर चुकीचे बोलले तर त्याबाबत मला कोणतीही हरकत नाही, कारण राजकारण्यांना सोयीनुसार या बोटावरची थुंकी त्या बोटावर करावीच लागते. त्यांची इच्छा नसली तरीही. पण माहितीच्या बाबतीत नेहमीच अचूक असण्याबद्दल ज्यांची ख्याती आहे, त्या शरद पवारांनीही चुकीचा आधार घ्यावा, हे मनाला रुचत नाही. याबाबतीत दोन नेमकी उदाहरणे नमूद करता येतील. पहिले उदाहरण राज ठाकरे यांनी घेतलेल्या त्यांच्या पुण्यातील जाहीर मुलाखतीचे. त्या मुलाखतीत त्यांनी सीताराम केसरींबद्दल दिलेली माहिती वस्तुस्थितीला धरुन नाही. गुजराल सरकार पडल्यानंतर सीताराम केसरींनी राष्ट्रपतींना भेटून कॉंग्रेस पक्षाला सरकार बनविण्यात रुची नाही असे सांगितल्याचा उल्लेख या लेखातच मी केला आहे. पण जाहीर मुलाखतीत मात्र पवार यांनी वेगळी आणि चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे असे की, सीताराम केसरींनी त्यांना डावलून स्वत: सरकार बनविण्याचा दावा केला. माझ्या माहितीप्रमाणे केसरींनी सरकार बनविण्यात रुची नाही असे राष्ट्रपतींना सांगितले होते. विरोधी पक्षनेता या नात्याने पवारांना विश्वासात घेण्यात आले नाही हे मात्र बरोबर असू शकते.

दुसरे ताजेच उदाहरण. विरोधी ऐक्याबाबत शरद पवार असे म्हणाले की, आणीबाणीच्या वेळी विरोधी ऐक्याच्या ‘कल्पनेला’ मी पाठिंबा दिला होता व त्यावेळी ते ऐक्य सरकार पाडण्यात यशस्वी झाले होते. यातील त्यांनी ‘विरोधी ऐक्याला मी पाठिंबा दिला होता’, या वाक्याला माझा आक्षेप आहे. विरोधी ऐक्य सफल झाले होते ही वस्तुस्थितीच आहे, पण पवारांचा त्या कल्पनेला पाठिंबा होता असे म्हणता येणार नाही. कारण १९७७ मध्ये ते जनता पक्षात नव्हते. उलट त्यांनी जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविली होती. १९७७ नंतर झालेल्या कॉंग्रेस फुटीच्या वेळी त्यांनी अर्स कॉंग्रेसचा आश्रय घेतला होता. १९७८ मध्ये त्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून इंदिरा कॉंग्रेसच्या सोबतीने वसंतदादांनी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. नंतर ते पुलोद सरकारचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे १९७७ मधील जनता प्रयोगाला त्यांचा पाठिंबा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.