पर्वरी पठारावर ४३ कोटी खर्चून भूमिगत वीज वाहिन्या घालणार

0
81

वीज खात्याने पर्वरी मतदारसंघातील पर्वरी पठारावरील वीज वाहिन्या भूमिगत घालण्याचा निर्णय घेतला आहे. वीज वाहिन्या भूमिगत घालण्याच्या कामावर अंदाजे ४२ कोटी ६९ लाख ६५ हजार ३७२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

राज्यातील विविध भागात खांबावरून वाहिन्या घालण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या वीज वाहिन्या अनेक भागात जुनाट झालेल्या आहेत. त्यामुळे वीज खात्याने वीज वाहिन्या भूमिगत पद्धतीने घालण्याच्या कामाला हळूहळू सुरुवात केली आहे. पर्वरी पठारावरील वाढत्या बांधकामांमुळे जोरात विकास होत आहे. सध्याच्या खांबांवरून घातलेल्या ११ केव्ही वीज वाहिन्या आणि उच्च दाबाच्या (एलटी) वीज वाहिन्यांमुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे खांबांवरून घालण्यात आलेल्या वीज वाहिन्या लवकरच बदलून भूमिगत घालण्यात येणार आहेत. वीज खात्याने या भूमिगत वाहिन्या घालण्यासाठी निविदा जारी केली आहे. भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम नऊ महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. कंत्राटदाराला एक वर्षांची हमी द्यावी लागणार आहे.