पर्रीकर सरकारचा पाठिंबा घटक पक्षांनी काढावा ः कॉंग्रेस

0
174

पणजी (न. प्र.)
भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पूर्णपणे नेतृत्वहीन झालेले असून ह्या पार्श्‍वभूमीवर या सरकारातील घटक पक्षांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, अशी मागणी काल कॉंग्रेस प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने राज्याचे प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नावाखाली केवळ अंदाधुंद व्यवहार चालू आहे, असा आरोप नाईक यानी केला.
गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पर्रीकर हे आजारी असून तेव्हापासून राज्याचे प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेले आहे. बंद पडलेला खाण उद्योग सुरू होईल म्हणून खाण अवलंबित वाट पाहत आहेत. बेरोजगार युवक-युवती सरकारी नोकर भरती सुरू होण्याची वाट पाहत आहेत. महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सरकार स्थापनेस कॉंग्रेस सक्षम
या पार्श्‍वभूमीवर राज्याला चांगले प्रशासन देऊ शकेल अशा सरकारची गरज असून ते सरकार केवळ कॉंग्रेसच देऊ शकेल, असे नाईक यानी सांगितले. कॉंग्रेस पक्ष सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे आणि म्हणूनच आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले जाण्याची गरज आहे. आम्ही त्यासाठी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना पाच वेळा निवेदन दिलेले आहे. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे ते म्हणाले.
भाजपाने हंगामी मुख्यमंत्र्यांची निवड करण्याकडेही दुर्लक्ष केल्याने परिस्थिती बिकट झाली असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.घटक पक्षाच्या नेत्यांनी आता जागे होण्याची गरज असून नेतृत्वहीन सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेणेच आता शहाणपणाचे होणार असल्याचे नाईक म्हणाले.