पर्रीकर परतणार!

0
157

>> १५ जूनपर्यंत येण्याची काब्रालना खात्री

स्वादुपिंडाच्या आजारामुळे गेल्या मार्च महिन्यापासून अमेरिकेत उपचार घेणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे चालू आठवड्यात गोव्यात परतण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी काल स्पष्ट केले. पर्रीकर यांची गोव्यात परतण्याची तारीख निश्‍चित झालेली नसली तरी आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती देताना पर्रीकर हे १५ जून रोजी गोव्यात परतणार असल्याचे सांगितले.

मनोहर पर्रीकर हे येत्या १५ जून रोजी गोव्यात परतणार आहेत, असे काब्राल यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी काल पर्रीकर हे नक्की कधी गोव्यात पोचणार आहेत हे स्पष्ट न करता ते या आठवड्यात गोव्यात पोचणार असल्याचे कळवले आहे. मुख्यमर्ंत्र्याना अमेरिकेतून गोव्यात परतण्यासाठीच्या विमान तिकिटांचे आम्ही बुकिंग करीत आहोत. पर्रीकर हे अमेरिकेतून मुंबईला व तेथून दुसर्‍या विमानाने गोव्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने पर्रीकर हे चालू आठवड्यातच गोव्यात परतणार असल्याचे जाहीर केल्याने ते अमेरिकेतून कधी परततील यासंबंधी चालू असलेल्या उलटसुलट प्रतिक्रिया व चर्चेला आता पूर्णविराम मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पर्रीकर हे गेल्या मे महिन्यात परतणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, ती खोटी ठरली होती. आपल्या गैरहजेरीत प्रशासन व्यवस्थित चालावे यासाठी पर्रीकर यांनी तीन मंत्र्यांच्या समितीकडे ताबा सोपवला होता. मात्र, आपला मुख्यमंत्रीपदाचा ताबा तात्पुरता का होईना एखाद्या दुसर्‍या मंत्र्यांकडे देण्याचे त्यांनी टाळले होते. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने सरकारवर टीका केली होती. तसेच राज्यपालांची भेट घेऊन राज्याला नवा मुख्यमंत्री देण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही त्यांच्याकडे केली होती.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अचानक आजारी पडल्याने व नंतर ते उपचारासाठी अमेरिकेत गेल्याने जवळ जवळ साडेतीन महिन्यांपासून राज्यात मुख्यमंत्री नाही अशी विचित्रशी स्थिती निर्माण झालेली आहे. पर्रीकर हे अमेरिकेला गेल्यापासून तेथूनच ईमेलद्वारे सरकारी फायली हातावेगळ्या करीत आहेत. मात्र, त्यांच्या गैरहजेरीत राज्यात मंत्रिमंडळ बैठका होऊ शकलेल्या नाहीत. पर्रीकर हे कधी गोव्यात परततील याकडे गोव्यातील जनतेबरोबरच त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांचेही लक्ष लागू राहिलेले आहे.
बंद पडलेला खाण उद्योग व राज्यातील वीज समस्या या दोन गोष्टी सध्या गोवा सरकारसाठी डोकेदुखी ठरलेल्या आहेत. तशातच वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हेही गंभीर आजारी असल्याने समस्येत भर पडली आहे.