पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत

0
142

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारासाठी काल संध्याकाळी ५.३० वाजता अमेरिकेत दाखल झाले. ते अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये सहा आठवडे उपचार घेणार आहेत.
बुधवारी पहाटे १.३० वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेला रवाना झाले होते. त्यांच्यासमवेत त्यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल आणि डॉक्टर आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी फेब्रुवारी महिन्यात पोटात त्रास सुरू झाल्याने गोमेकॉत तपासणी केली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पर्रीकर यांनी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये सात दिवस उपचार घेतले होते. त्यानंतर गोव्यात परत येऊन राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. गोव्यात परतल्यानंतर काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी डिहायड्रेशन व रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने पाच दिवस गोमेकॉमध्ये उपचार घेतले होते.
सोमवारी मुख्यमंत्री पर्रीकर वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये पुन्हा दाखल झाले होते.

पर्रीकर लवकर बरे व्हावे : ममता
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे. ‘गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरजी यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा!’ असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.