पर्रीकर उपचारांसाठी अमेरिकेला रवाना

0
124

>> १७ ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री अनुपलब्ध

>> प्रधान सचिवांकडे प्रशासकीय कामकाजाची सूत्रे

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या आजारावरील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईमार्गे अमेरिकेला काल रवाना झाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर १० ते १७ ऑगस्ट दरम्यान राज्यात उपलब्ध नसतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाने काल कळविले आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अमेरिकेला रवाना होताना मागील वेळी प्रमाणे मंत्रिमंडळ सदस्यांच्या खास समितीची स्थापना केलेली नाही. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्रीही आजारी असल्याने ताबाही कुणाकडे दिलेला नाही. मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेत उपचार घेत असताना राज्य सरकारच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कृष्णमूर्ती प्रशासकीय ङ्गाईल्स हाताळणार आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राज्यपालांना अमेरिका दौर्‍याची माहिती दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांना पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०१८ रोजी पोटदुखीचा त्रास जाणवला होता. त्यानंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेण्याची सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर पर्रीकर यांनी मुंबईच्या हॉस्पिटलात काही दिवस वैद्यकीय उपचार घेतले. २२ फेब्रुवारीला गोव्यात परत येऊन अर्थसंकल्प सादर केला होता.

त्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर ८ मार्चला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमेरिकेला वैद्यकीय उपचारांसाठी रवाना झाले होते. तेथे तीन महिन्यांच्या उपचारानंतर गेल्या १४ जून रोजी परतले होते. राज्यात परतल्यानंतर सरकारी पातळीवरील कामकाजाला गती दिली. तसेच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थिती लावली. मंत्रिमंडळातील आजारी तीन मंत्र्यांच्या खात्याच्या प्रश्‍नांना सुध्दा त्यांनी विधानसभेत उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना ईमेल, फोनच्या माध्यमातून कारभार हाताळावा लागणार आहे.

सभापतींकडे ध्वजारोहणाची जबाबदारी
पणजीत जुन्या सचिवालयासमोर होणार्‍या राज्यस्तरीय स्वातंत्र्य दिनी सोहळ्यात ध्वजारोहण करण्याची जबाबदारी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्यावर विश्‍वास दाखवून एक मोठी जबाबदारी सोपविली आहे. पणजीत ध्वजारोहण करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, अशी प्रतिक्रिया सभापती डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.