पर्रीकर अमेरिकेतून परतले

0
196

>> आज मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी चर्चा शक्य

>> भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण

अमेरिकेतून तेरा आठवड्यांच्या उपचारानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल दाबोळी विमानतळावर संध्याकाळी सहा वाजता एअर इंडियाच्या विमानातून मुंबईहून आगमन झाले. अमेरिकेतून दाबोळीपर्यंतच्या प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय पथक आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी होते. दरम्यान, पर्रीकर आज शुक्रवारी मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी काल दिली.

काल संध्याकाळी ६ वाजता पर्रीकरांचे एअर इंडियाच्या विमानाने मुंबईहून आगमन झाले. ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तसेच गोव्याच्या प्रमुख पोलीस निरीक्षकांच्या कडक पहार्‍यात बाहेर आल्यानंतर सरळ आपल्या गाडीत जाऊन बसले. यावेळी उपस्थित पोलिसांनी प्रसारमाध्यमांना त्यांना प्रश्‍न विचारण्यास मज्जाव केला. त्यांनी हात उंचावून उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र उत्पल, अभिजित तसेच आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे उपस्थित होते.

सहकार्‍यांशी आज चर्चा शक्य
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज शुक्रवारी मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी काल दिली. पर्रीकर राज्यात परतल्याने मंत्रिमंडळातील सहकार्‍यांबरोबर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेतून परतल्यानंतर प्रथम मंत्रिमंडळाची बैठक घेतील, अशी चर्चा सुरू आहे. परंतु, राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य परराज्यात दौर्‍यावर असल्याने मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाणार नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांना अमेरिका ते गोवा या मोठ्या अंतराच्या प्रवासामुळे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कामकाजाला गती मिळणार
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आजारपणामुळे मागील तीन महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आगमनामुळे सरकारी कामकाजाला गती मिळण्याची शक्यता आहे. राज्यात खाणबंदी, रोजगार भरती व इतर महत्त्वाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. पर्रीकर यांच्या अनुपस्थित मंत्रिमंडळ सल्लागार समितीकडून कामकाज हाताळले जात होते.
चाहत्यांना गर्दीस मज्जाव
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज गोव्यात आगमन होणार याची बातमी काल वर्तमानपत्रांमध्ये झळकताच सकाळपासून वास्को शहरात दाबोळी विमानतळावर ते किती वाजता पोचणार याविषयी चर्चा चालू होती. दरम्यान, संध्याकाळी येणार याची चाहूल लागताच त्यांच्या चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दाबोळी विमानतळावर पोलिसांनी पर्रीकरांच्या चाहत्यांना गर्दी करण्यास मज्जाव केला.

कडेकोट पोलीस बंदोबस्त
दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्र्यांना कुणीही गराडा घालू नये तसेच शुभेच्छा देऊ नये याची खास दक्षता घेण्यात आली होती. दुपारी चार वाजल्यापासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर, उपअधीक्षक सुनिता सावंत, वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक निनाद देऊलकर, वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ व इतर पोलीस निरीक्षक फौज फाट्यांसह उपस्थित होते.

आज घेणार श्रीमहालक्ष्मीचे दर्शन
मुख्यमंत्री पर्रीकर शुक्रवारी सकाळी १० वाजता श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी दिली. मुख्यमंत्री पर्रीकर आजारातून प्रकृतीची सुधारल्यानंतर प्रथमच श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव कोणताही स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

पोहोचताच प्रधान सचिवांशी चर्चा
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या ताळगाव – दोनापावला येथील निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पर्रीकर यांनी निवासस्थानी पोहोचल्यानंतर प्रधान सचिव कृष्णमूर्ती, विशेष अधिकारी उपेंद्र जोशी यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आरोग्य सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कुणालाही भेटू दिले जात नाही. त्यामुळे विमानतळावर सुध्दा आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर व अधिकार्‍यांची उपस्थिती होती.