पर्रीकरांनी पाठिंबा घेतला तेव्हा खटल्यांची माहिती नव्हती का?

0
197

>> बाबुशबाबत कॉंग्रेसचा भाजपला सवाल

गोवा विधानसभेच्या २०१७ च्या पणजीतील पोट निवडणुकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा भाजपचे उमेदवार स्व. मनोहर पर्रीकर यांनी बाबूश मोन्सेरात यांचा पाठिंबा घेतला त्यावेळी बाबूश यांच्या विरोधातील खटल्याची माहिती भाजपला नव्हती का? असा प्रति प्रश्‍न कॉंग्रेस पक्षाने भाजपला काल केला.

भाजपात प्रवेश केल्यानंतर भ्रष्टाचारी नेते शुद्ध होतात. भाजप सरकारमधील मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री विश्‍वजित राणे, आमदार पांडुरंग मडकईकर यांच्यावर माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण झाले. भाजपच्याजवळ असताना त्यांना त्या नेत्याचे अवगुण दिसत नाहीत. मात्र, भाजपपासून दूर गेल्यानंतर त्या राजकीय नेत्यांचे अवगुण दिसू लागतात, अशी टिका कॉंग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी केली.

मोन्सेरात योग्य वेळी माहिती जाहीर करतील
कॉंग्रेसचे उमेदवार मोन्सेरात निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे योग्य वेळी आपल्या विरोधातील खटल्याची माहिती जाहीर करतील. भाजपचे प्रवक्ते दामू नाईक यांनी खटल्याची माहिती जाहीर करण्याबाबत सांगण्याची गरज नाही. पर्रीकर यांनी २०१७ च्या पोट निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांचा पाठिंबा घेतला होता. भाजप आघाडी सरकारने मोन्सेरात यांची नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ग्रेटर पणजी पीडीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यावेळी खटल्याचा मुद्दा का उपस्थित करण्यात आला नाही. त्यावेळी दामू नाईक गप्प का बसले, असेही बुयांव म्हणाले. दामू नाईक यांनी फातोर्ड्यातील प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे. सोनसडोतील कचर्‍याच्या प्रश्‍नावर भाष्य नाही. मासळीतील फॉर्मेलीन या विषयावर कोणतेही भाष्य् केले नव्हते. पणजीतील पाणी प्रश्‍न, स्मार्ट सिटीतील गैरकारभारावर भाष्य करावे, असेही बुयांव यांनी सांगितले.