पर्रीकरांचे समाधीस्थळ मिरामारला साकारणार

0
122

>> जीएसआयडीसीतर्फे लवकरच डिझाईनची निवड

भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मिरामार येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधी शेजारी समाधीस्थळ उभारण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ ह्या समाधीसाठी उत्कृष्ट रचनेची (डिझाईन) निवड करणार असल्याचे जीएसआयडीसील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील वरील महामंडळ यासाठी वास्तू रचनाकारांची स्पर्धा घेणार आहे.

१७ मार्च रोजी दिवंगत झालेल्या मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर मिरामार येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीजवळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेला राज्याच्या कानाकोपर्‍यातून जनसागर लोटला होता. मनोहर पर्रीकर यांची मिरामार येथे अंत्यसंस्कार केलेल्या जागीच समाधी उभारण्यात येणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते. ह्या समाधी स्थळावर पर्रीकर यांच्या जीवनाविषयीची माहिती असेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

पर्रीकर यांची जेथे समाधी उभारण्यात येणार आहे तेथे भाऊसाहेबांची समाधी असल्याने त्या ठिकाणी पर्रीकर यांची समाधी उभारताना ती पूर्णपणे वेगळी न बांधता तो संपूर्ण कॉम्प्लेक्स बनवावा, अशी सूचना जीएसआयडीसीचे माजी उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी केली होती.
दरम्यान, जीएसआयडीसीच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले आमदार जोशुआ डिसोझा यांनी पर्रीकर यांचे समाधीस्थळ बांधण्याच्या कामास आपण प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.