पर्रीकरांचे पुनरागमन

0
92

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा गोव्यात परतण्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची आणि पर्रीकरांचे संरक्षण खाते अरुण जेटलींकडे सोपवले जाणार असल्याची बातमी दोन – तीन महिन्यांपूर्वी दिल्लीहून आली होती. परंतु केवळ खातेपालट होणार की पर्रीकर पुन्हा गोव्यात परतणार यासंबंधी तेव्हा स्पष्टता नव्हती. परंतु मध्यंतरी स्वतः पर्रीकर यांनी दिलेल्या काही मुलाखतींत आपल्याला दिल्लीपेक्षा गोवाच कसा आवडतो हे सांगत स्वतःच्या गोव्यात परतण्याच्या अटकळीला हवा दिली होती. त्यामुळे पर्रीकरांच्या पुनरागमनाविषयी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची प्रतिक्रिया काय होते याकडे माध्यमांचे लक्ष होते. ‘पर्रीकर परत येत असतील तर त्यात आनंदच आहे’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांकडून आली आणि पर्रीकरांच्या पुनरागमनाच्या चर्चांना वेग आला. अर्थात, ही प्रतिक्रिया किती मनापासूनची आहे हा प्रश्न आहेच, कारण पर्रीकरांचे परतणे म्हणजे पार्सेकरांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत मेहनतीने उमटवलेल्या स्वतःच्या ठशावर पाणी ओतण्यासारखे आहे. खरे तर पर्रीकर जेव्हा गोव्याहून गेले, तेव्हा त्यांच्या जागी विराजमान झालेले पार्सेकर ती महाकाय पोकळी कसे भरून काढणार असा प्रश्न जनतेला पडला होता. परंतु पर्रीकरांच्या कार्यशैलीची नक्कल करण्याच्या फंदात न पडता त्यांनी स्वतःच्या प्रज्ञेेने आणि शैलीने काम करायला सुरूवात केली आणि आपला बर्‍यापैकी जम बसवला. अर्थात, पर्रीकरांची धडाडी, आक्रमक कार्यशैली, त्यांची प्रशासनावरील प्रचंड पकड, कोणताही प्रसंग निभावून नेण्याचे कौशल्य आणि मुख्य म्हणजे राज्यातील अल्पसंख्यक समुदायात असलेली लोकमान्यता या गोष्टी पार्सेकरांपाशी नव्हत्या. परंतु उगाच वेळ मारून नेणारी वक्तव्ये न करता सत्य परखडपणे सांगण्याचा पार्सेकरांचा गुण जनतेला भावला. राज्याच्या विशेष दर्जाच्या विषयातच याची चुणूक दिसून आली. मुख्यमंत्री बनल्यानंतर पार्सेकरांचा अंतर्बाह्य मेकओव्हरही गोव्याने पाहिला. रंगबिरंगी कुर्त्यांमध्ये पार्सेकर दिमाखदार तर दिसलेच, परंतु वरच्या पट्टीतला आवाज असूनही आपले वागणे – बोलणेही शांत, संयमी आणि विनम्र ठेवण्याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. त्यामुळे पर्रीकरांच्या  ‘तुका खबर ना. हांव सांगता, तू आयक’ धाटणीच्या  वर्तनाच्या पार्श्वभूमीवर हा बदल लोकांना ठळकपणे जाणवला. सर्वांना सोबत घेऊन जाणे पार्सेकरांना कसे जमणार हाही प्रश्न जनतेच्या मनात होता. मुख्यमंत्रिपदावर आरूढ होतानाच उद्भवलेला पक्षांतर्गत संघर्ष, राजेंद्र आर्लेकर आणि फ्रान्सिस डिसोझांनी मुख्यमंत्रिपदासाठी सादर केलेली स्वतःची उमेदवारी, काही मंत्र्यांचे आदेशासाठी दिल्लीकडेच लागून राहिलेले डोळे, दयानंद मांद्रेकरांसारख्यांनी उघडपणे घेतलेली पार्सेकरविरोधी भूमिका, उपमुख्यमंत्र्यांनी केलेली उघड बंडाळी आणि स्वतः पर्रीकर यांनी दिल्लीत राहूनही शनिवार – रविवार गोव्यात येऊन येथील सरकारवर ठेवलेला आपला दूरनियंत्रक यामुळे पार्सेकरांचे सिंहासन तसे स्थिर नसल्याचे जाणवत होते. परंतु आगामी निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याचे सांगून पार्सेकरांनी स्वतःचे नेतृत्व स्थिरावल्याचा आभास निर्माण केला होता. मात्र, नंतर नंतर प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयासाठी त्यांनी जेव्हा ‘दिल्ली’चे मत महत्त्वाचे मानले तेव्हा आपल्याच हाताने आपल्या पायांवर कुर्‍हाड मारण्याचे काम त्यांनी केले. विशेषतः शैक्षणिक माध्यम प्रश्नावर पर्रीकरांच्या निर्णयाच्या मागे फरफटत जाण्याचे त्यांना काही कारण नव्हते, परंतु भाभासुमंने मांद्य्राच्या सभेत तोफ डागली तशा ‘कोणाच्या म्हशी, कोण काढते उठाबशी’ काढत पार्सेकरांनी स्वतःचेच अवमूल्यन करून घेतले. पर्रीकर गोव्यात परतणार हे अजूनही निश्‍चित नाही, कारण त्यांची जागा घेऊ शकतील अशा तोलामोलाची मोजकीच माणसे दिल्लीत आहेत. परंतु कोणाकोणाच्या काय प्रतिक्रिया येतात याची चाचपणी मात्र बराच काळ सुरू आहे. गोव्याला पर्रीकरांशिवाय पर्याय नाही असे बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांना वाटते ही वस्तुस्थिती आहे. त्यात शैक्षणिक माध्यम प्रश्नावर स्वकियच विरोधात उभे राहिल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात पर्रीकर असतील तरच तरणोपाय आहे हे पक्षाला आता कळून चुकले आहे. स्वतः ते तर गोव्यात परतण्यास उत्सुक आहेतच, कारण त्यांचे दिल्लीत जाणे हे केवळ पंतप्रधानांच्या इच्छेखातर घडले होते. स्वतः पर्रीकर यांची ती महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती, परंतु पंतप्रधानांच्या माध्यमातून देशाची हाक या भावनेने तेव्हा ते धावून गेले होते. आता ती जबाबदारी पार पाडल्यावर गोव्याचे मासे पर्रीकरांना खुणावू लागले तर नवल नाही!